चिपळूण( वार्ताहर ) : सह्याद्री सामाजिक संस्था पुणे या संस्थेचा सातवा वर्धापन दिन सोहळा पुणे येथील सदाशिव पेठ स्काऊट ग्राउंड या ठिकाणी पार पडला. यावेळी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले .
सामाजिक क्षेत्रामध्ये गेले काही वर्ष सह्याद्री कोकण सामाजिक संस्था अतिशय चांगल्या प्रकारे काम करून तळागाळातील लोकांना सेवा देण्याचा प्रयत्न करत आहे. सामाजिक बांधिलकी मधून या संस्थेचे ऋणानुबंध लोकांशी जुळले आहेत.
संस्थेच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त संस्थेने शैक्षणिक साहित्याचे वाटप विद्यार्थ्यांना केले. यामध्ये इयत्ता दहावी आणि बारावी मधील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून त्यांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सचिन तावरे , वसुधा नाईक, सौ स्नेहल हनमघर व विकास लांबोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रमुख अतिथी श्री तावरे यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शक करताना सांगितले की, वाचन हे मेंदूचे अन्न आहे. त्यामुळे मुलांनी वाचण्याची सवय लावावी . मोबाईलचा वापर फक्त चांगल्या कामासाठी तेवढ्यापुरताच करावा. जास्त करून वाचन संस्कृती जपण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच मुलांची बौद्धिक क्षमता आणि वैचारिक प्रगल्भता वाढीस लागेल. यामुळे त्यांचे शैक्षणिक करिअर सुद्धा चांगल्या प्रकारे होऊ शकते असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष रोशन ओकटे यांनी सुद्धा मार्गदर्शन केले. सह्याद्री कोकण सामाजिक संस्थेच्या वर्धापन दिनाला अनेक मान्यवरांनी विविध भागातून उपस्थिती दर्शवली होती. संस्थेचे अध्यक्ष रवींद्र नवेले, सचिव सुनील डीके सर्व पदाधिकारी व सर्वांनीच मान्यवरांचा सन्मान केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप वनगे यांनी केले तर सूत्रसंचालन रवींद्र कुळे यांनी केले तर आभार अमोल चिनकटे यांनी मानले .










