बीएसएनलच्या तांत्रीक बिघाडामुळे राजापूरातील रेल्वे आरक्षण सेवा ठप्प

 

राजापूर (प्रतिनिधी): बीएसएनएलच्या तांत्रिक बिघाडामुळे राजापूर शहर पोस्ट सेवा कार्यालयातील रेल्वे आरक्षण सेवा गेले दोन आठवड्याहून बंद असून त्यामुळे प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

अथक प्रयत्नानंतर काही महिन्यांपूर्वी कोकण रेल्वे प्रशासनाने राजापूर पोस्ट कार्यालयात रेल्वे आरक्षण सेवा सुरू केली होती. मागील काही महिन्यात तालुक्यातील नागरिकांनी त्या सेवेचा चांगल्या प्रकारे लाभ घेतला. मुंबईसह देशभरात कुठेही प्रवाशांना रेल्वेचे आरक्षण राजापूर पोस्ट कार्यालयातुन मिळत आहे. राजापूर पोस्ट कार्यालयात एक स्वतंत्र खिडकी उघडून तेथून रेल्वे प्रवाशांना तिकिटे सहज उपलब्ध होत आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये तालुक्यातील रेल्वे प्रवाशांनी रेल्वे आरक्षण सेवेचा चांगल्या पद्धतीने लाभ घेतला आहे. यामध्ये दैनंदिन मुंबई कडे जाणाऱ्या व परत येणाऱ्या प्रवाशांचा सर्वाधिक समावेश असून राजापूर पोस्ट कार्यालयात सुरू करण्यात आलेल्या रेल्वे आरक्षण सेवेला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद लाभत आला आहे. मात्र गेले दोन आठवड्याहून अधिक काळ बीएसएनएल सेवेमध्ये निर्माण झालेला तांत्रिक बिघाडामुळे राजापूर पोस्ट कार्यालयातील रेल्वे आरक्षण सेवा ठप्प झाली आहे. त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे. राजापूर पोस्ट कार्यालयातील रेल्वे आरक्षण सेवा केंद्र बंद असल्याने आरक्षणासाठी आलेल्या प्रवाशांना हात हलवीत माघारी जावे लागत आहे. त्यामुळे प्रवाशांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

काही महिन्यांपूर्वी राजापूर पोस्ट कार्यालयात रेल्वे आरक्षण सेवा केंद्र सुरू करण्यात आले होते. यापूर्वी राजापूर वगळता जिल्ह्यातील अन्य पोस्ट कार्यालयात रेल्वे आरक्षण सेवा सुरू करण्यात आली होती. राजापूर पोस्ट कार्यालयात देखील ती सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून सातत्याने प्रयत्न होत होते. संबंधित मंत्र्यांसह कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा सुरू होता. मात्र काही वर्षे त्याला यश आले नव्हते. अखेर संबंधित कोकण रेल्वे प्रशासनाने राजापूर पोस्ट कार्यालयात रेल्वे आरक्षण सेवा केंद्र सुरू केले. आणि समस्त राजापूरकरांची एक मागणी पूर्ण केली होती. या आरक्षण केंद्रातून दररोज चांगला प्रतिसाद मिळत होता.

मागील काही महिन्यांमध्ये या रेल्वे आरक्षण सेवेला तालुका वासीयांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. मात्र आता बिघाडामुळे गेले आठवडे हे रेल्वे आरक्षण केंद्र बंद असल्याने प्रवाशांना गैरसोईचा सामना करावा लागत आहे. संबंधित कोकण रेल्वे प्रशासनाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि निर्माण झालेल्या तांत्रिक बाबी तात्काळ दूर कराव्यात व ठप्प झालेली रेल्वे आरक्षण सेवा पूर्ववत सुरू करावी अशी जोरदार मागणी प्रवासी वर्गातून करण्यात आली आहे.

——————————————————————-