माजी खासदार, भाजप नेते निलेश राणे आज पाहणी करणार
चिपळूण (प्रतिनिधी)- तालुक्यातील सावर्डे येथील सचिन कात इंडस्ट्रीजच्या कातभट्टीचा त्रास असहाय्य झाल्याने येथील ग्रामस्थ आता संतापले असून त्यांनी आता थेट आंदोलनाची भूमिका घेतली आहे. स्थानिक ग्रामस्थांची दखल भाजप नेते माजी खासदार निलेश राणे यांनी घेतली असून शुक्रवारी सावर्डे येथे येऊन पाहणी केल्यानंतर ते ग्रामस्थांची भेट घेणार आहेत. त्यामुळे चिपळूणमध्ये कात हा विषय चांगलाच गाजण्याची शक्यता आहे.
सावर्डे येथील कात भट्टीचा त्रास येथील स्थानिक ग्रामस्थांना होत आहे. गेले कातभट्टीचे पाणी थेट येथील नदीत जात असल्याने येथील नदी पूर्णपणे प्रदूषित झाली असून परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरलेली आहे. तसेच येथील विहिरी व बोरवेलला देखील लाल भडक प्रदूषित पाणी येत असून तेच पाणी ग्रामस्थांना प्यावे लागत आहे. गेले कित्येक वर्ष हा त्रास स्थानिक ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे. यासंदर्भात अनेकवेळा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार देखील ग्रामस्थांनी केली होती. परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले असा ग्रामस्थांचा आरोप आहे.
यापूर्वी देखील ग्रामस्थांनी आंदोलनाची भूमिका घेतली होती. त्यावेळी प्रशासनाने दखल घेत २०१६ मध्ये येथील कातभट्टी बंद करण्याचे आदेश दिले होते. परंतु अद्यापही कातभट्टी सुरू कशी असा प्रश्नही ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. सुमारे ७ गावांना हा त्रास भोगावा लागत असून तक्रार करून देखील दुर्लक्ष केले जात असल्याने आता ग्रामस्थांनी थेट आंदोलनाची भूमिका घेतली असून प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालवर धडकण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे.
दरम्यान, या विषयाची दखल भाजप नेते माजी खासदार निलेश राणे यांनी घेतली असून ते स्वतः शुक्रवारी सावर्डे येथे येत आहेत. यावेळी ते प्रत्यक्षात कातभट्टीची पाहणी करून वस्तुस्थितीची माहिती घेणार आहेत. त्यानंतर येथील ग्रामस्थांची भेट घेऊन त्यांना होणाऱ्या त्रासाबाबत माहिती घेणार आहेत.निलेश राणे स्वतः येथे येत असल्याने ग्रामस्थांनी देखील तयारी केली आहे.त्यामुळे आता निलेश राणे नेमकी कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.












