सरपंच योगेश शिर्के यांच्याकडून प्रशासनास जाग आणण्याचा प्रयत्न!
चिपळूण (प्रतिनिधी)--ः चिवेली ग्रामस्थांनी सातत्याने पाठपुरावा आणि आंदोलने केल्यानंतर कौंढरताम्हाणे ते चिवेली लोणारी बंदर रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून करण्यात आला. त्यासाठी साडेचार कोटी रूपये खर्च करण्यात आले. मात्र या रस्त्यावर पावसाळ्यात सातत्याने खड्डे पडतात. संबंधित विभागास निवेदन देऊनही फरक पडत नाही. त्यामुळे चिवेली सरपंचानी नामी शक्कल लढवीत अनोख्या स्पर्धेचे आयोजन केले आहे. या मार्गावर चिवेली ग्रामपंचायत हद्दीत सेल्फी युवीथ खड्डा स्पर्धा घेत संबंधित विभागास जागे करण्याचा प्रयत्न केला आहे.
या स्पर्धेची माहिती देताना सरपंच योगेश शिर्के म्हणाले, निर्मल ग्रामपंचायत चिवेली कार्यक्षेत्रातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजना सन २०२०-२०२१ योजने अंतर्गत सुमारे ४.५० कोटी रूपये खर्च करून बनविण्यात आलेल्या रस्त्याची दुरावस्था हि पहिल्याच पावसाळ्यात झाली. वारंवार पत्रव्यवहार केल्यानंतर समजुतीच्या भावनेने काम करत होते.
परंतु संबंधीत ठेकेदाराची रस्त्याच्या दुरूस्तीची जबाबदारी ऑक्टोबर २०२५ पर्यंत असून रस्त्याची आर्युमर्यादा हि चिरंतर राहील असे वाटत नाही. ग्रामपंचायतीच्या वतीने या रस्त्यामधील नादुरूस्त भाग, वाढलेली दुतर्फा झाडी, दिशादर्शक फलक, वाडीचे नामनिर्देशक फलक, साईट पट्टीसाठी टाकलेले मातीचे ढिगारे, गटारांमध्ये असलेले दगड आणि रस्त्याला मोठ्या प्रमाणात गेलेले तडे व खड्डे हि कामे लवकरात लवकर पूर्ण व्हावी, अशी मागणी ग्रामस्थ करित आहेत. या संपूर्ण रस्त्यांमधील एकूण असणाऱ्या खड्डयांची संख्या, सेल्फी विथ खड्डा तसेच नादुरूस्त असणारा रस्त्याचा भाग विथ सेल्फी अशा बाबी ग्रामपंचायतीस निदर्शनास आणल्यास मी सरपंच या नात्याने माझ्या मानधनातून ग्रामस्थांसाठी स्पर्धा आयोजित करीत आहे. विजेत्याला योग्य ते बक्षिस व गावातील जबाबदार व जागृत व्यक्तिमत्व अशा नावाने सन्मानचिन्ह व रोख रक्कम देवून सन्मानित करण्यात येईल.
या मार्गावर पावसाळ्याच्या कालावधीत दरडी कोसळण्याचे प्रकार घडतात. गेल्या दोन तिन दिवसापासून सुरू असलेल्या पावसात येथे दरडी कोसळण्यास सुरवात झाली. गुरूवारी सकाळी भले मोठे दरड रस्त्यावर आले होते. सुदैवाने त्यावेळी अनुचीत प्रकार घडला नसल्याचे सरपंच शिर्के यांनी स्पष्ट केले.












