महाराष्ट्र राज्यामध्ये पोलीस दलात भरती प्रक्रिया सुरु आहे. आज काल कोणत्याही विभागात होणारी भरती होत असेल तर सहाजिकच त्या शासकीय भरती प्रक्रियेत भ्रष्टाचार झालेलाच असतो किंवा भ्रष्टाचार झाल्याशिवाय शासकीय नोकरभरती होणारच नाही. दिल्या शिवाय आणि घेतल्याशिवाय काय होतच नाही असा सर्वसाधारणपणे सर्वांचाच एक समज झालेला आहे.
हा समज बदलावा म्हणून प्रशासनातील अधिकारी प्रयत्न करीत नाहीत. किंवा समाज म्हणून आपणही जबाबदारी पार पाडत नाही. यामुळे भ्रष्टाचार थांबणार कसा काहीही करुन नोकरी मिळवायची असते म्हणून मग जमेल त्या पध्दतीने सेवेत भरती व्हायचेच यासाठी बेकार असलेल्या तरुणांची धडपड रहाते. बहुतांश वेळा प्रशासनातील अधिकारी याचा बरोबर फायदा उठवतात. आणि मग बोली सुरु होते. हे कुठल्याही एका शासकीय भरती प्रक्रियेपूर्ता विषय मर्यादित रहात नाही. सगळीकडे सारखच रहाते पंरतु जर कोणत्याही विभागाच्या प्रमुख अधिकार्यांनी जर ठरवल तर याबाबतीतही सुधारणा घडून येऊ शकते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील यापूर्वी झालेल्या काही भरती प्रक्रियेत फारच कटाक्ष ठेवून भरती प्रक्रिया राबविली गेली.मुंबईतील पोलीस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना, रेल्वे पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, संतोष रस्तोगी अशा काही पोलीस अधिकारी यांनी एक रुपयाचेही करप्शन होऊ दिल नाही. मल्लिकार्जुन प्रसन्ना सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक असताना त्यांच्या पोलीस अधीक्षक कार्यकाळात जी भरती प्रक्रिया पार पडली.
त्यामध्ये त्या भरती प्रक्रियेत दररोज त्या त्या स्टेपच्या होणाऱ्या निवड झालेल्या तरुणांना सतत भ्रष्टाचार करु नये अशा प्रकारे त्यांना एक तास मार्गदर्शन केले जात होते. या एक तासात भ्रष्टाचार हि समाजाला कशी किड लागलेली आहे. त्यामुळे सर्व सामान्य गोरगरिबांना कसा त्रास होत असतो. त्याचा परिणाम आपल्या कुटुंबापर्यंत कशारितीने होत असतो अशा अनुषंगाने हि चर्चा व्हायची. मल्लिकार्जुन प्रसन्ना हे सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक असताना त्यांच्याशी त्याकाळी बोलताना ते म्हणाले होते एवढ्या मोठ्या प्रमाणावर पोलीस भरती होत असताना करप्शन हि समाजाला लागलेली किड आहे.
हि लागलेली किड नष्ट करणे आपली जबाबदारी आहे. याच भान, जाणीव जरी या पोलीस दलात दाखल होऊ पहाणाऱ्या तरुणांना असली तरी बरच साध्य होऊ शकेल. आभाळ फाटलय त्या फाटलेल्या आभाळाला ठिगळ लावण अवघड आहे. मात्र तरीही प्रयत्न करत रहाण आपल काम आहे. हे श्री. प्रसन्ना नेहमीच चर्चा करताना म्हणायचे सतत जे समुपदेशन केल जातय यातून पोलीस भरतीतील शे दिडशे तरुणांतील पाच तरुण जरी पोलीस दलात सेवेत दाखल झाल्यानंतर करप्शन पासून दूर राहिले तरी ते आम्ही केलेल्या समुपदेशनाच यशच म्हटल पाहिजे.
अस तत्कालीन पोलीस अधीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना यांच म्हणण असायच.. सध्या मुंबईत पोलीस महानिरीक्षक पदावर कार्यरत असतानाही त्यांनी स्वतः मध्ये कोणताही बदल केलेला नाही. सध्या महाराष्ट्र राज्याच्या पोलीस दलातील भरती प्रक्रियेमुळे याची आठवण झाली. सिंधुदुर्ग , रत्नागिरी जिल्ह्यातील पोलीस भरती प्रक्रिया सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अगरवाल आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक रावले तर रत्नागिरी जिल्ह्यातील पोलीस भरती प्रक्रिया पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. रत्नागिरी – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीस दलातील भरती प्रक्रियेतही पारदर्शकता राखली जात आहे. यामुळे निश्चितच जे तरुण या भरती प्रक्रियेत सहभागी असतील त्यांच्यावर अन्याय होणार नाही. अशी अपेक्षा करायला हरकत नसावी.









