नवीन कायदा लागू : महाराष्ट्रातील पहिला गुन्हा सावंतवाडी दाखल

सावंतवाडी : ब्रिटिशकालीन भारतीय दंड विधान संहिता १८६० फौजदारी प्रक्रिया संहिता ऐवजी भारतीय न्याय संहिता कायदे १ जुलै २०२४ पासून लागू करण्याची घोषणा केंद्र सरकारने केली होती. महाराष्ट्रातही हे कायदे लागू झाले. त्यानंतर या नव्या कायद्याअंतर्गत पहिला गुन्हा सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आंबोली येथे घडला. महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची माहिती काल विधानसभेत दिली.
नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्रातील पहिला गुन्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. आंबोली येथे गोव्यातील पर्यटकांच्या कारला अपघात झाला यात कार वरील चालकाचा ताबा सुटल्यामुळे ती झाडाला जाऊन धडकली या अपघातात चार जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी संबंधित कारचालकावर नवीन कायद्यानुसार तपास करून दोषारोपपत्र सादर केले जाणार असल्याची माहिती सावंतवाडी पोलीस निरीक्षक तानाजी नारनवार यांनी दिली.

 

ब्रिटिशकालीन भारतीय दंड विधान संहिता १८६०, फौजदारी प्रक्रिया संहिता १८८२ व भारतीय पुरावा कायदा १८७२ हे तिन्ही कायदे बदलण्याबाबतचे विधेयक पारित झाले. त्यानंतर भारतीय न्यायसंहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता व भारतीय पुरावा अधिनियम हे तीन कायदे एक जुलै पासून लागू करण्याची घोषणा केंद्र सरकारने केली होती. एक जुलै २०२४ रोजी सदर कायद्याच्या अंमलबजावणीची पहिल्याच दिवशी सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आंबोली येथे मध्यरात्री २.२९ वाजता झालेल्या अपघातानंतर हा गुन्हा कार चालक अतुल दुल्लप चौधरी याच्यावर दाखल करण्यात आला.सदर गुन्ह्याचा तपास नवीन कायद्यातील तरतुदीनुसार करण्यात येणार आहे.

 

गृहमंत्र्यांकडून विधानसभेत माहिती सादर
नवीन फौजदारी कायद्याच्या अंमलबजावणीच्या पहिल्याच दिवशी सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आंबोली येथे जो अपघात घडला या प्रकरणी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मात्र या गुन्ह्याचा नवीन कायद्यानुसार तपास केला जाणार आहे. महाराष्ट्रातील हा पहिला गुन्हा नवीन कायद्यानुसार हाताळला जाईल अशी माहिती विधानसभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.