नांदरुख साळकुंभा व घुमडे ग्रामस्थ संतप्त : पोलिसांना निवेदन देत कारवाईची मागणी
अमित खोत | मालवण : गावामध्ये ओहळात ग्रामस्थांनी स्वखर्चातून गणपती विसर्जनासाठी तयार केलेली गणेश कुंड आहेत. याठिकाणी तसेच घुमडे गांव हद्दीतील भारत गॅस गोडाऊन बाजूला असलेल्या धबधबा ठिकाणी शहरातील व बाजूच्या गावातील लोकं येवून पार्ट्या करतात. दारू पिऊन अश्लील वर्तन करतात. यासाठी गावात गस्त वाढवावी, गौरवर्तन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. अशी संतप्त मागणी नांदरुख, घुमडे सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच महिला व ग्रामस्थ यांनी मालवण पोलीस प्रशासनाकडे केली आहे.
ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, आम्ही ग्रामस्थ साळकुंभावाडी, घुमडे आपल्याजवळ आग्रही मागणी करतो की, आमच्या गावामध्ये ओहळात ग्रामस्थांनी स्वखर्चातून गणपती विसर्जनासाठी तयार केलेली गणेश कुंड आहेत. येथे शहरातील व बाजूच्या गावातील लोकं येवून पार्ट्या करतात. दारू पिऊन अश्लील वर्तन करतात. आंघोळ करतात व एक प्रकारे गैरप्रकार करतात. गावातील मुली शाळा, कॉलेज मध्ये जाता येता त्यांनाही मोठ्या प्रमाणात त्रास दिला जातो. गावातील महिला नेहमी प्रमाणे ओहळात कपडे धुण्यास जात असतात. त्यांच्या समोरही मोठ्या प्रमाणात गैरवर्तन केले जाते. महिला नी त्यांना समजूतीने सांगण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही उलट उत्तरे दिल्याचे प्रकार घडले आहेत.
या सर्व गैरप्रकारंमुळे गावातील महिला व शाळा-कॉलेज मधील मुली यांमध्ये काहीसे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गावातील महिलांनी पुढाकार घेत सदर ठिकाणी कुंपण घातले. तसेच या ठिकाणी कोणीही आंघोळ, दंगा, पार्ट्या करू नये अश्या आशयाचा फलक लावला. मात्र कुंपण तोडून आत घुसून पार्ट्या, अंघोळ, दंगा सूरू करण्यात आला आहे.
तरि आपण या गंभीर विषयाकडे लक्ष देऊन हे प्रकार बंद होणासाठी योग्य ती कार्यवाही करून प्रसंगी कठोर कारवाई करावी. या परिसरात गस्त वाढवावी. ग्रामस्थांच्या वतीने आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल. मात्र हा त्रास बंद करावा. अशी मागणी मालवण पोलीस प्रशासनास निवेदनाद्वारे देण्यात आली आहे. यावेळी पोलिसांनीही गैरवर्तन करणाऱ्यावर कारवाई केली जाईल असे स्पष्ट केले.
यावेळी नांदरुख, घुमडे सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच महिला व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.












