घरच्या लोकांनी आपल्या पाठीवर शाबासकीची थाप मारल्याचा विशेष आनंद -निलेश चव्हाण

 

चिपळूण (संतोष सावर्डेकर): आतापर्यंत देश- विदेशात जे मला पुरस्कार भेटले. त्याच्यामध्ये ह्या पुरस्काराला विशेष महत्त्व आहे. घरच्या लोकांनी कौतुकाने पाठीवर शाबासकीची थाप मारल्याचा आनंद होतो आहे. या मातीत आपण वाढलो. तिथल्या- आपल्या घरच्या लोकांनी कौतुक करणं हे माझ्यासाठी खूपच आनंददायी आणि अभिमानाची गोष्ट आहे, असे असे प्रतिपादन फेडरेशन पुरस्कृत जागतिक उद्योजकता पुरस्कारप्राप्त उद्योजक निलेश चव्हाण यांनी केले.

 

फेडरेशन ऑफ रत्नागिरी डिस्ट्रिक्ट चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज रत्नागिरी जिल्हा उद्योग विकास परिषद अंतर्गत उद्योजकता पुरस्कार २०२४ हा कार्यक्रम चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या सहकार भवनातील सहकार सभागृहात नुकताच झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय रेल्वे व उद्योग मंत्री सुरेश प्रभू हे होते.

जागतिक उद्योजक पुरस्कार स्कॉन प्रोजेक्टच्या निलेश चव्हाण यांना प्रदान करण्यात आला. यावेळी ते म्हणाले की, वेगळी वाट धरावी, असा आपण पहिल्यावेळेस ठरवलं होतं. धंदाच करायचा हेही मनात पक्क होतं. पुण्यात जाऊन नोकरी केली आणि मग पुढे व्यवसायात उतरलो. आज आपल्याकडे असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये अधिक तरुण कोकणातील आहेत, असे त्यांनी सांगितले. कोको-कोलाचा ८०० कोटींचा प्रकल्प आपण वर्षभरात लोटे एमआयडीसीत उभा करू आणि जागतिक विक्रम करू, असेही त्यांनी सांगितले. आपल्याकडे येणाऱ्या कर्मचाऱ्याला अपघात विमा, मेडिक्लेम, टर्म इन्शुरन्स, असं सर्व काही दिलं जातं किंवा एसआयपीच्या माध्यमातून आर्थिक नियोजन केले जाते आणि निवृत्तीला प्रत्येक कर्मचारी करोडपती होऊनच आपल्या कंपनीतून बाहेर पडेल, असे त्यांनी सांगितले. वडिलांच्या नावाने एक ट्रस्ट असून अन्य दोन फाऊंडेशनच्या माध्यमातून आपण सामाजिक बांधिलकी जपत आहोत. चिपळूणमध्ये पूर आल्यानंतर दहा टन साहित्य घेऊन पहिली माझी कंपनी येथे पोहोचली. दररोज आम्ही अडीच हजार लोकांना भटारखाना चालवून भोजन देत होतो. ४५ कर्मचारी यासाठी राबत होते. भविष्यात देखील व्यवसायाबरोबर जनसेवा देखील करणार आहोत अशी ग्वाही निलेश चव्हाण यांनी यावेळी दिली.

 

 

या कार्यक्रमात जिल्हा फेडरेशनच्या जीवनगौरव पुरस्काराने गद्रे मरीन एक्सपोर्टचे दीपक गद्रे, सर्वोत्कृष्ट स्टार्टअप पुरस्काराने वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत यादव व मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव, जागतिक उद्योजकता पुरस्काराने स्कॉन प्रोजेक्टचे चेअरमन उद्योजक निलेश चव्हाण, रत्नागिरी जिल्हा उद्योजकता सामाजिक पुरस्काराने घरडा केमिकल्स कंपनी, सर्वोत्कृष्ट उद्योजक डिलाईट इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे अनिल देवळे यांना माजी मंत्री केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

 

 

यावेळी व्यासपीठावर पुरस्कार प्राप्त उद्योजकांसह, चिपळूण सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण, माजी आमदार डॉ विनय नातू, जेष्ठ पत्रकार मधुकर भावे, फेडरेशनचे अध्यक्ष प्रशांत पटवर्धन, सचिव केशव भट, उपाध्यक्ष राजू सावंत, माजी आमदार रमेश कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

 

 

या कार्यक्रमाला सौ. उमा सुरेश प्रभू, सेवानिवृत्त अप्पर आयुक्त एस.बी. पाटील, चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन अशोक साबळे, संचालक रवींद्र भोसले, सत्यवान मामुनकर , सोमा गुडेकर, रवींद्र भोसले, शिवसेना उत्तर रत्नागिरी जिल्हा संपर्कप्रमुख सचिन कदम, सुरेश साठे, विनंती कंपनीचे जनसंपर्क अधिकारी सचिन खरे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक फेडरेशनचे अध्यक्ष प्रशांत पटवर्धन तर सूत्रसंचालन प्रा. सौ. डॉ. मीनल ओक यांनी केले.