राजापूर पोष्ट कार्यालयातील रेल्वे आरक्षण सेवा पुर्ववत सुरू

राजापूर (वार्ताहर): बीएसएनएलच्या तांत्रिक बिघाडामुळे राजापूर पोस्ट कार्यालयातील रेल्वे आरक्षण सेवा कोलमडली होती. मात्र, आता बीएसएनएल सेवेतील तांत्रिक बिघाड दूर झाल्याने सुमारे दोन-तीन आठवड्याच्या कालावधीनंतर कोलमडलेली रेल्वे आरक्षण सेवा पुन्हा एकदा कार्यान्वित झाली आहे. त्यामुळे पोष्ट कार्यालयामध्ये रेल्वे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

 

स्थानिक लोकांसह लोकप्रतिनिधींकडून सातत्याने केलेल्या प्रयत्नांनतर कोकण रेल्वे प्रशासनाने राजापूर पोस्ट कार्यालयात रेल्वे आरक्षण सेवा कार्यान्वित केली आहे. मुंबईसह देशभरात कुठेही प्रवाशांना रेल्वेचे आरक्षण राजापूर पोस्ट कार्यालयातुन मिळत आहे. राजापूर पोस्ट कार्यालयात एक स्वतंत्र खिडकी उघडून तेथून रेल्वे प्रवाशांना तिकिटे सहज उपलब्ध होत आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये तालुक्यातील रेल्वे प्रवाशांनी रेल्वे आरक्षण सेवेचा चांगला लाभ घेतला आहे. यामध्ये दैनंदिन मुंबईकडे जाणार्या व परत येणार्या प्रवाशांचा सर्वाधिक समावेश आहे. मात्र, गेल्या दोन-तीन आठवड्याहून अधिककाळ बीएसएनएल सेवेमध्ये निर्माण झालेला तांत्रिक बिघाडामुळे राजापूर पोस्ट कार्यालयातील रेल्वे आरक्षण सेवा ठप्प झालेली होती. त्याचा फटका प्रवाशांना बसत होता.

 

 

राजापूर पोस्ट कार्यालयातील रेल्वे आरक्षण सेवा केंद्र बंद असल्याने आरक्षणासाठी आलेल्या प्रवाशांना रेल्वे गाड्यांचे आरक्षण करण्याऐवजी रिकामी हाताने मघारी परतावे लागत होते. त्यामुळे प्रवाशांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती. दरम्यान, बीएसएनएल सेवेमध्ये आलेला तांत्रितक बिघाड आता दूर झाला आहे. त्यामुळे कोलमडलेली रेल्वे आरक्षण सेवा आता पूर्ववतपणे कार्यान्वित झाल्याची माहिती राजापूर पोष्ट प्रशासनाकडून देण्यात आली. त्यामुळे रेल्वे आरक्षण करून इच्छीणाऱ्या लोकांसह प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.