‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ एकही लाभार्थी वंचित राहणार नाही, त्यासाठी विशेष शिबीरांचे आयोजन करा

जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह

रत्नागिरी, :’मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ या राज्यशासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेत एकही लाभार्थी वंचित राहणार नाही, त्यासाठी विशेष शिबीरांचे आयोजन करुन तेथेच अर्ज स्वीकारावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात राज्य शासनाच्या विविध योजनांच्या अनुषंगाने आज बैठक घेण्यात आली. बैठकीला अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांच्यासह सर्व प्रातांधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. म्हणाले, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी सर्वांनी टार्गेट मोडमध्ये काम करावे. त्यासाठी विशेष शिबीरांचे आयोजन करा. त्याच शिबीरांमध्ये अर्ज स्वीकारावेत. त्याला लागणारे कागदपत्रही तेथेच जागेवर द्यावेत. बचतगट, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर ग्रामीण आणि नागरी भागात गटविकास अधिकारी आणि मुख्याधिकारी यांनी अर्ज भरण्याबाबत नियोजन करावे. तर तहसिलदार यांनी पिवळे, केशरी शिधापत्रिका डाटानुसार नियोजन करावे. त्यासाठी रेशन दुकानदारांची मदत घ्यावी. शनिवार, रविवार विशेष शिबीर आयोजित करण्याबाबत सर्वांनी नियोजन करावे. कोणतीही समस्या उद्भवणार नाही, याची सर्वांनी काळजी घ्यावी. 7.5 एचपी पंप किती शेतकऱ्यांकडे आहेत, याबाबतची माहिती संकलित करावी. शुभमंगल सामुहिक योजनेंत 10 हजारावरुन 25 हजार अनुदान करण्यात आले आहे. त्याबाबत लाभार्थ्यांची माहिती, वयोश्री योजना, महिलांसाठी प्रवास सवलत योजना आदी योजनांची माहिती सादर करावी, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.