अनेकांच्या घरातील पंखे, फ्रिज, टीव्ही आदी उपकरणे जळाली, हजारो रुपयांचे नुकसान

 

खेरवसे जाधववाडी येथील घटना ,अचानक वाढलेल्या उच्च विद्युत दाबाचा फटका

संतोष कोत्रे l    लांजा – अचानक वाढलेल्या विद्युत दाबामुळे खेरवसे जाधववाडी येथील अनेक ग्रामस्थांच्या घरातील पंखे ,टीव्ही, फ्रिज यासारखी विद्युत उपकरणे जळून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री २ च्या सुमारास घडली आहे. महावितरणच्या या भोंगळ कारभारामुळे ग्रामस्थांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. काही ठिकाणी सातत्याने वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार सुरूच आहेत. लांजा शहरात देखील हा प्रकार सुरू आहे .याच पार्श्वभूमीवर खेरवसे जाधववाडी येथे गुरुवारी रात्री दोनच्या सुमारास अचानकपणे वाढलेल्या विद्युत दाबामुळे येथील अनेक ग्रामस्थांच्या घरातील टीव्ही, ब्रिज, पंखे, ट्यूबलाइट आदी विद्युत उपकरणे जळून तर काही घरातील वीज उपकरणे नादूरुस्त झाली आहेत. त्यामुळे या ग्रामस्थांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

विद्युत उपकरणे जळून नुकसान झालेल्यांमध्ये प्रवीण जाधव, विजय जाधव, सदानंद जाधव, मनोहर सावंत, राजू सावंत, रामचंद्र मेस्त्री, मंगला लोटनकर, राजेंद्र मेस्त्री, सुरेंद्र ब्रीद ,रामदास सावंत, परशुराम जाधव ,संतोष लोटणकर, रवींद्र केशव लोटणकर यांसह अशा अनेक ग्रामस्थांचे यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे .महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेट देऊन नुकसान झालेल्या ग्रामस्थांच्या उपकरणाबाबत पंचनामे करावे आणि नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी खेरवसे जाधववाडी येथील ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.