रस्त्यावर गोवंशाचे शीर सापडले; रत्नागिरीत संताप

आरोपींना तत्काळ शोधून काढून कठोर कारवाईची मागणी

पोलिसांच्या तपासाच्या दिशेकडे हिंदू समाजाचे लक्ष

रत्नागिरी । प्रतिनिधी :
शहरानजीकच्या मिरजोळे एमआयडीसी येथे लहान गोवंशाचे शीर सापडल्याचा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार गुरुवारी रात्री घडल्यानंतर रत्नागिरी शहर आणि परिसरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. हिंदुत्वादी संघटनांसह रत्नागिरीकर नागरिकही आक्रमक झाले असून पोलीस दबाव विरहीत आणि कोणत्या दिशेने तपास करत आहेत याकडे हिंदू समाजाचे लक्ष लागलेले आहे. गुरुवारी घडलेला हा प्रकार उघड झाल्यामुळे समोर आला आहे, मात्र गोवंशाची कत्तल आणि तस्करीचे प्रकार रत्नागिरी आणि परिसरात सातत्याने घडत असून संबंधितांवर कठोर कारवाई केली जात नसल्याची भावना सर्वत्र दिसून येत आहे. रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपासासाठी पथके तयार केली आहेत. दरम्यान पालकमंत्री उदय सामंत यांनी प्रशासनाला सूचना केल्या आहेत तर भाजपा नेते निलेश राणे यांनी आक्रमक प्रतिक्रीया देताना पोलिसांकडून ठराविक उत्तरे न देता योग्य तपासाची अपेक्षा व्यक्त केली आहे.

मिरजोळे एमआयडीसीतील फ्लोट क्र.४४ नजिक मुख्य रस्त्यावर उतारात लहान गोवंशाचे शीर गुरुवारी रात्री काही तरुणांना आढळून आले. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास हि घटना उघड झाल्यानंतर त्या तरुणांनी भारतीय जनता पक्षासह मनसे आणि हिंदुत्ववादी संघटनाशी संपर्क केला.  त्यानंतर भाजपचे युवक जिल्हा उपाध्यक्ष नंदू चव्हाण, मनसेचे शहर प्रमुख अमोल श्रीनाथ, पशूप्रेमी संध्या कोसूबंकर, गणेश गायकवाड यांच्यासह  अनेकजण मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले. समोर दिसलेला अवयव पाहून उपस्थितांच्या भावना तीव्र झाल्या. त्याचवेळी ग्रामीण पोलीस निरिक्षक नितिन ढेरे, शहर पोलीस निरिक्षक महेश तोरसकर हे आपल्या कर्मचार्यांसह घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी घटनेचा पंचनामा सुरु झाला तर पशुवैद्यकिय अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले होते.

जो पर्यंत हे कृत्य करणाऱ्या व्यक्तीला पोलीस अटक करत नाहीत तोपर्यंत अवशेष घटनास्थळा वरून हलवू देणार नाही, आम्ही आहे तिथेच बसून राहू अशी भूमिका जमावाने घेतली होती. एकीकडे पोलीस अधिकारी जमावाशी बोलण्याचा प्रयत्न करत असतानाच  अचानक तेथे जिल्हा पोलीस दलाची राखीव तुकडी दाखल झाली आणि त्याच्या प्रमुखाने जवानांना जमावाला घेरण्याच्या सुचना दिल्या. हे पाहून जमाव आक्रमक झाला. परिस्थिती हाताबाहेर जाईल असे वाटल्यानंतर राखीव तुकडी पुन्हा गाडीत जावून बसली.

त्यानंतर संपूर्ण जमाव रात्री उशिरा ग्रामीण पोलीस स्थानकावर धडकला तर रात्री उशिरा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी जमावाला भेटण्यासाठी दाखल झाले होते. पोलीस अधीक्षक त्यांची भूमिका आणि तपास काम याबद्दल सांगत असतानाही जमावाच्या भावना तीव्र झालेल्या होत्या. गेले अनेक महिने गोवंश हत्या आणि तस्करीचे प्रकार रत्नागिरीत सुरु आहेत, याला मोठा पाठींबा आहे, पोलिसांकडून कठोर कारवाई केली जात नाही, अनेकदा आरोपींना सोडून दिले जाते अशा प्रतिक्रिया जनतेमधून उमटत होत्या.  या प्रकरणातील आरोपींना अटक केल्याशिवाय आम्ही हलणार नाही अशी भूमिका जमावाने घेतली. त्यानंतर अज्ञाताविरुद्ध रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला.  तर येत्या काही तासात आरोपींना पकडले जाईल असेही पोलिसाकडून सांगण्यात आले.  त्यानंतर शुक्रवारी पहाटे जमाव पोलीस स्थानकातून निघून गेला.

दरम्यान या सगळ्या काळात ग्रामीण पोलिसांनी काही पथके एखादी संशयित गाडी दिसते का ते शोधण्यासाठी महामार्गावर पाठवली होती. मात्र पोलिसांना यश आले नाही.  तर शुक्रवारी दिवसभर गोवंशाचे शीर नेमके कुठून आले, याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी मिरजोळे एमआयडीसी परिसराचा तपास सुरु केला आहे. यासंदर्भात काही साक्षीदार पोलिसांना सापडल्याचे सांगण्यात येत आहे.  पोलिसांकडून याबाबत कोणतीही अधिकृत प्रेस नोट प्रसिध्द झालेली नाही. मात्र पोलिसांच्या एकूणच तपासाकडे संपूर्ण हिंदू समाजाचे लक्ष लागून राहिले आहे. आजपर्यंत गोवंश हत्या आणि तस्करीचे अनेक प्रकार रत्नागिरीत घडत असतानाही त्याचा योग्य तपास होत नाही अशा तीव्र आणि कडवट प्रतिक्रिया जमावामधून उमटत होत्या.  पोलिसांवर दबाव असल्याचेही लोकांचे म्हणणे होते.

दरम्यान ही घटना घडून गेल्यानंतरही रत्नागिरीमध्ये वातावरणात तणाव असून हे प्रकार त्वरित थांबलेच पाहिजे अशी मागणी रत्नागिरीकर आणि हिंदू समाजाकडून होत आहे.