आत्मदहन प्रकरण : त्या महिलेचे मोबाईल काॅल डिटेल्स तपासा

 

 

उबाठाचे स्वीकृत नगरसेवक मनोज सावंत यांचा खरा चेहरा समोर येईल 

वैभववाडी उपनगराध्यक्ष संजय सावंत यांची टीका 

वैभववाडी l प्रतिनिधी :   वाभवे – वैभववाडी नगरपंचायतचे स्वीकृत नगरसेवक मनोज सावंत हे केवळ स्टंटबाजी करत आहेत. स्टॉल हटाव मोहिमेवेळी अंगावर डिझेल ओतून घेतलेल्या त्या महिलेला नेमका कुठच्या नगरसेवकाचा कॉल आला होता. हे पोलिसांनी शोधल्यास मनोज सावंत यांचा खरा चेहरा समाजासमोर येईल. अशी टीका उपनगराध्यक्ष संजय सावंत यांनी उबाठाचे नगरसेवक मनोज सावंत यांच्यावर केली आहे.

मनोज सावंत हे गमावलेला विश्वास परत मिळवण्यासाठी पोलिसांच्या आजूबाजूला फिरत आहेत. पोलिसांनी न बोलावता उतावळेपणाने जाणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबाच आहेत. पोलिसांच्या कार्यप्रणालीवर व तपासावर आमचा विश्वास आहे. पोलीस यंत्रणेकडून सदरहू आत्मदहन प्रकरणाचा तपास कोणत्या पातळीवर आला आहे हे अजून स्पष्ट नसले तरी तपास पारदर्शक होईल याची आम्हाला खात्री आहे.

स्टॉल हटाव ची कारवाई सुरू असताना न. पं. ने केलेल्या व्हिडिओ शूटिंग मध्ये ती महिला

मोबाईल वर बोलत असल्याचे दिसत आहे. तो कॉल उचलून संभाषण झाल्यावर तात्काळ त्या महिलेने अंगावर डिझेल ओतून घेतले. तो कॉल कोणाचा हे पोलिसांनी लवकरात लवकर शोधून काढावे.

प्रतिक्रिया देताना भेदरलेल्या व घाबरलेल्या मनोज सावंत यांनी त्यांची त्रेधातिरपीट उडत होती. नेमका आरोप कोणावर करावा हे त्यांना सुचत नव्हते. त्यांनी माझ्यावर केलेला आरोप हास्यास्पद आहे. तो जर त्याने सिद्ध केल्यास मी राजकीय संन्यास घेईन. अन्यथा त्यांनी तरी घ्यावा असे पत्रकात संजय सावंत यांनी म्हटले आहे.