राष्ट्रवादीकाँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे नेते प्रशांत यादव यांची मागणी
चिपळूण (प्रतिनिधी) : चिपळूण शहरातून बहादूर शेख ते पाग नाकापर्यंत सर्वात मोठा पूल बांधण्यात येत आहे. परंतु या पुलाच्या कामाच्या दरम्यान सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कमालीचा हलगर्जीपणा आणि दुर्लक्ष होत आहे. त्यामुळेच दोनवेळा मोठे आणि गंभीर अपघात झालेले आहेत. या संदर्भात आमच्या पक्षाने गंभीर दखल घेतली असून संबंधित खात्याने त्वरित योग्य त्या उपाययोजना कराव्यात. खास करून यासंदर्भात महामार्गाचे कार्यकारी अभियंता व उपअभियंता यांनीकामाच्या ठिकाणी भेट देऊन याबाबत भविष्यात सुरक्षेच्या बाबत काय करता येईल याची तपासणी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदश्चंद्र पवारचे नेते प्रशांत यादव यांनी केली आहे.
गेल्याच आठवड्यामध्ये या पुलाचे काम करत असताना तीन कंत्राटी कामगार गंभीर जखमी झाले होते. या अगोदर पुलाचे दोन गर्डर कोसळून मोठा अपघात झाला होता. या दोन्ही अपघाताच्या दरम्यान एक गोष्ट स्पष्टपणे समोर आली आहे, ती म्हणजे कोणत्याही प्रकारच्या पूरेसी सुरक्षितता आणि सुरक्षा याची उपाययोजना करण्यात आली नव्हती. कामगारांना साधे हेल्मेट किंवा सेफ्टी शूज व इतर सुरक्षतेची साधने पुरवण्यात आली नव्हती, ही अत्यंत गंभीर बाब आहे. त्यामुळे पूलाच्या एकूणच कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहेत. या अपघाताची गंभीर दखल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने घेतली आहे असे स्पष्ट करताना प्रशांत यादव यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात पुढे नमूद केले आहे की, आम्ही कोणत्याही विकास कामांमध्ये अडथळा आणू इच्छित नाही. परंतु मानवी मूल्य आणि मानवी जीवन अत्यंत महत्त्वाचे आहे व व आमच्या दृष्टीने या गोष्टीला प्राधान्य देणे महत्त्वाचे आहे. त्या दृष्टिकोनातून कोणताही कामगार व कर्मचाऱ्यांच्या जीवितास धोका होणार नाही अशा प्रकारच्या सुरक्षतेच्या दृष्टीने व औद्योगिक मानांकनाच्या नियमानुसार जे उपाययोजना करण्याच्या सुचित करण्यात आल्या आहेत, त्यानुसार सर्व करण्यात याव्यात व यापुढे अपघात होणार नाही अशीच दक्षता घ्यावी, अशी मागणी प्रशांत यादव यांनी केली आहे.
हा पूल अपघातानंतर पूर्ण होताना रखडला आहे परिणामी शहरातील वाहतूक ही विस्कळीत होताना दिसत आहे व महामार्ग नजीक शहरातील जी नागरी वस्ती आहे त्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. एकूणच राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे सर्वसामान्य चिपळूणकर नागरिकांना प्रचंड मनस्ताप होत आहे. त्यामुळे यास्तव हा पूल लवकरात लवकर पूर्ण व्हावा यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी ठेकेदार कंपनी यांनी आपण यामध्ये नेमके कोणत्या कृती करणार आहेत याची माहिती द्यावी व आम्हाला नागरी आंदोलन उभे करण्याची वेळ येऊ देवू नये, असा इशाराही प्रशांत यादव यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकातून दिला आहे.











