राज्य शासनाच्या काथ्या उद्योग धोरणानुसार महिलांनी उद्योग करून फायदा घ्यावा..

Google search engine
Google search engine

जिल्हा उद्योग केंद्राचे जनरल मॅनेजर श्रीपाद दामले यांचे वेंगुर्ले येथे प्रतिपादन

वेंगुर्ले | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील महिलांना रोजगार व स्वयंरोजगार निर्माण करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. सीएमईजीपी योजनेतून ५० लाख रुपये पर्यंत स्वयंरोजगार करू इच्छिणाऱ्या महिलांना या प्रशिक्षणाचा निश्चित फायदा होईल. राज्य शासनाच्या काथ्या उद्योग धोरणानुसार उद्योग करून महिलांनी याचा फायदा घ्यावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे जनरल मॅनेजर श्रीपाद दामले यांनी वेंगुर्ले येथे बोलताना केले.
महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, जिल्हा उद्योग केंद्र व महिला काथ्या औद्योगिक सहकारी संस्था वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने महिला काथ्या सहकारी संस्थेच्या हॉल मध्ये एक महिना कालावधीचा ‘तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम’ संपन्न झाला. यावेळी समारोप कार्यक्रमात मार्गदर्शन करताना श्री.दामले बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर कॉयर फाउंडेशनचे चेअरमन एम.के. गावडे, एमसीईडी चे शंकर सावंत, एमसीईडी चे रामचंद्र गावडे, महिला काथ्या संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका प्रज्ञा परब, डीआयसीचे मॅनेजर प्रशांत पाटील आदी उपस्थित होते. काथ्या उद्योगाचे आजपर्यंत ३ हजार पेक्षा जास्त महिलांना प्रशिक्षण दिले आहे. रत्नागिरीतही अनेक महिलांना प्रशिक्षण देण्याबरोबरच गुहागर तालुक्यातील ६०अपंगांना काथ्या प्रशिक्षण दिले आहे. प्रशिक्षण घेतलेल्या अपंगांना लवकरच उद्योगाभिमुख ऍडव्हान्स ट्रेनिंग देण्यात येणार आहे. वेंगुर्ले येथे सुरू होणाऱ्या क्वायर क्लस्टर उद्योगामधून हजारो महिलांना रोजगार उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर स्वयंरोजगारासाठी इच्छुक महिलांना स्वयंरोजगाराची संधी प्राप्त होणार आहे. राज्य शासनाच्या सहकार्याने तयार झालेल्या क्वायर क्लस्टरचे उद्घाटनही लवकच करण्यात येणार आहे, असे यावेळी एम. के. गावडे यांनी बोलताना सांगितले. या प्रशिक्षणात उद्योगाबाबत माहिती, उद्योग उभारण्यासाठी बँक कर्ज, मार्केटिंग, वैयक्तिक वेळ व्यवस्थापन, नेतृत्वविकास, काथ्या प्रॉडक्ट प्रात्यक्षिक याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.या प्रशिक्षणाचा ७० महिलांनी लाभ घेतला.