मंडणगड | प्रतिनिधी : मंडणगड तालुक्यातील पालघर येथे भारजा नदीच्या प्रवाहात अडकून एका जाळीस तग धरुन बसलेला दीपक तांबुटकर या तरुणास सुखरुप बाहेर काढण्यात रेस्कु टिमला यश आले. हि घटना रविवारी सायंकाळी घडली. या तरुणास वाचवण्यासाठी स्थानीक ग्रामस्थ, तहसीलदार, महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन व पोहणारया व्यक्तीनी मेहनत घेतली.

रविवारी झालेल्या अतिवृष्टीत तालुक्यातील मोठी असलेल्या भारजा नदीला पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला. भारजा नदीवर असलेल्या मांदिवली व चिंचघर ला जोडणाऱ्या पुलासह तालुक्यातील अनेक ठिकाणांच्या मोरी व कॉजवेवरुन पाणी जाऊन अनेक गावांचा संपर्क तुटल्याने तालुक्यातील जनजीवन काही काळाकरिता विस्कळीत झाले. याशिवाय रस्त्यावर दरड कोसळणे, झाडे पडणे यांमुळे रविवारी पावसामुळे तालुक्यातील जनजीवन प्रभावित झाले.
रविवारी सकाळी केळवत घाटात रस्त्यावर झाड कोसळल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली, माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभागाने जेसीबीच्या सहाय्याने हे झाड बाजूला करून वाहतूक पूर्ववत केली. तुळशी घाटात दरड कोसळण्याचे सत्र सुरूच आहे. रविवारी सकाळी झालेल्या अतिवृष्टीत तुळशी घाटात पुन्हा दोन ते तीन ठिकाणी रस्त्यावर मोठ्याप्रमाणात दरड आल्याने वाहतूक ठप्प झाली. यावेळी तहसीदार श्रीधर गालीपेल्ली यांनी तातडीने दरड हटवण्यासंदर्भात आपत्ती व्यवस्थापन कक्षास सूचना केल्या. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जेसीबीच्या सहाय्याने दरड बाजूला करून वाहतुकीसाठी मार्ग मोकळा केला. भिंगळोलीतील शासकीय विश्रामगृहाजवळ ओढ्याचे पाणी रस्त्यावर आल्याने याठिकाणीही वाहतुकीसाठी अडथळा निर्माण झाला. दरम्यान, 14 जुलै 2024 रोजी तालुक्यात सरासरी 133.25 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. रविवारी देखील दिवसभर संततधार पाऊस सुरु होता
तालुक्यातील सावित्री, भारजा, निवळी या मुख्य नद्यांसह लहान मोठे ओढे दुथडी भरुन वहात आहेत. भारजा नदीला पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली. याचबरोबर चिंचाळी व भोळवली ही दोन धरणे पुर्णपणे भरली असून अन्य धरणे पंच्यानव टक्याहून अधिक पातळीत भरली आहेत.












