खेड रेल्वे स्थानकात प्रवाशांचा ठिय्या

खेड(प्रतिनिधी)
गाडी पुढे किती वाजता जाणार हे विचारत गेले २४ तास ताटकळत असलेल्या प्रवाशांनी खेड येथील स्टेशन मास्तरला जाब विचारत धारेवर धरले. त्यामुळे खेड रेल्वे स्टेशन परिसरात काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. या संदर्भातील माहिती खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांना समजतात त्यांनी खेड पोलिसांची कुमक या ठिकाणी तात्काळ रवाना करत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.
रविवारी मुसळधार झालेल्या पावसामुळे दरड कोसळून कोकण रेल्वे मार्ग बंद झाला होता. हा मार्ग सोमवारी  संध्याकाळी उशिराने सुरू होईल अशी शक्यता होती. या मार्गावरील आलेली माती – दरड रेल्वे प्रशासनाने बाजूला करून रेल्वे सुरू करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. परंतु ट्रॅक ओके आहे का नाही ? याची खात्री करण्यासाठी खेड रेल्वे स्थानकात उभी करण्यात आलेली प्रवासी विरहीत मांडवी एक्सप्रेस प्रथम या ट्रॅकवरून पुढे सोडण्यात आली. परंतु तद्नंतर चिपळूण रेल्वे स्थानकातून सोडण्यात आलेली एक प्रवासी असलेली गाडी खेड रेल्वे स्थानकात येऊन साडेचार वाजण्याच्या सुमारास थांबवण्यात आली. ती गाडी नेमकी पुढे किती वाजता जाईल ? यासंदर्भात प्रवाशांना प्रश्न उपस्थित झाला होता. काल झालेले या दुर्घटनेमुळे ते प्रवासी चिपळूण रेल्वे स्थानकामध्ये तब्बल २४ तास ताटफळत बसले होते. चिपळूण रेल्वे स्थानकातून खेड रेल्वे स्थानकात ही गाडी आल्यानंतर तब्बल दीड ते दोन तास एकाच ठिकाणी उभी असल्यामुळे प्रवासी वर्ग वैतागला होता. त्यामुळे त्या प्रवाशांकडून खेड येथील स्टेशन मास्तरांना ही गाडी नेमकी किती वाजता पुढे जाईल या संदर्भात प्रश्न विचारण्यात आले. स्टेशन मास्तरांनी त्यांना तसं कोणतंही ठोस उत्तर न दिल्यामुळे संतापलेल्या प्रवाशांची स्टेशन मास्तरांसह तेथे स्थानिक रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सोबत शाब्दिक बाचाबाची झाली. परंतु खेड पोलिसांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर वातावरण निवळलेले पाहायला मिळाले संध्याकाळी उशिरापर्यंत खेड रेल्वे स्थानकात ही गाडी थांबवून ठेवण्यात आलेली होती.