माखजन इंग्लिश स्कूल येथे ‘आषाढ रंग’ कार्यक्रम*

 

 

*माखजन |वार्ताहर*    संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माखजन इंग्लिश स्कूल माखजन मध्ये कै.पांडुरंग सीताराम लघाटे संगीत कक्षा मार्फत आषाढी एकादशी निमित्त ‘आषाढ रंग’ हा गीत गायनाचा कार्यक्रम मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.जय जय रामकृष्ण हरी या नाम घोषाने मैफिलीला सुरवात झाली.तर सुंदर ते,ओंकार प्रधान,टाळ बोले चिपळीला, माझे माहेर पंढरी, चंद्रभागेच्या तिरी,झाला महार पंढरीनाथ आदी बहारदार गीत सादर केली.

यामध्ये कार्यक्रमाची मूळ संकल्पना असलेल्या ज्येष्ठ शिक्षक संतोष कुलकर्णी यांनी रूप पाहता लोचनी हा अभंग गाऊन कार्यक्रमात रंगत आणली.तर अक्षय राजवाडे यांनी रखुमा माझी पेरणी करी हा अभंग सादर केला.संस्था संचालक दीपक पोंक्षे यांनी अबीर गुलाल उधलीत रंग हा अभंग गाऊन रसिकांची वाहवा मिळवली.

संगीत शिक्षक विशारद गुरव यांनी इंद्रायणी काठी,व कानडा राजा पंढरीचा ही अवीट गाणी सादर करत रसिकांची मने जिंकली.तर आग्रहास्तव नारायण रमा रमणा हे नाट्य पद सादर केलं.

या कार्यक्रमाला संस्था अध्यक्ष डॉ.दत्तात्रय बापट,सचिव सुभाष सहस्त्रबुद्धे,दीपक शिगवण,संजय सहस्त्रबुद्धे आदींसह भिकू किंजळकर आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे निवेदन सचिन साठे व गौरव पोंक्षे यांनी केले.