खेड (प्रतिनिधी) –
लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात आला. २८ जुलै २०२५ रोजी, ला. रोहन विचारे यांचे बंधू श्री. जीवन विचारे यांच्या वाढदिवसानिमित्त नवभारत हायस्कूल, भरणे येथील मुला-मुलींच्या वसतिगृहासाठी जिन्नाचे (अन्नधान्य) वाटप करण्यात आले.
मुंबई येथे स्थायिक असलेले श्री. जीवन मनोहर विचारे हे सामाजिक जाणिवेने प्रेरित असून, त्यांचे लहान बंधू आणि लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे माजी अध्यक्ष श्री. रोहन विचारे हे गेल्या तीन वर्षांपासून वसतिगृहातील विद्यार्थ्यांना अन्नधान्य स्वरूपात सातत्याने मदत करत आहेत. यंदाही त्यांनी आपल्या बंधूच्या वाढदिवसानिमित्त निस्वार्थ भावनेने समाजसेवेची परंपरा कायम ठेवली.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या या कार्याचे भरभरून कौतुक केले. अशा सेवाभावी आणि उदात्त हेतूने समाजासाठी काम करणाऱ्या व्यक्तीमुळेच खऱ्या अर्थाने सामाजिक सलोखा व आधार निर्माण होतो, असे मत यावेळी अनेकांनी व्यक्त केले.
या वेळी लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे अध्यक्ष श्री. महेंद्र शिरगावकर, माजी अध्यक्ष रोहन विचारे, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी ला. सुरेश चिकणे सर, ला. शैलेश धारिया, ला. संदीप मोरे, ला. सागर चिखले तसेच नवभारत हायस्कूलचे शिक्षकवर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांनी श्री. जीवन विचारे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना केली.
हा उपक्रम म्हणजे केवळ वाढदिवसाचा एक सोहळा नसून, गरजू विद्यार्थ्यांसाठी दिलेली एक मनःपूर्वक मदत होती. अशा सेवाभावी उपक्रमांद्वारे समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणता येते, हेच यावेळी पुन्हा एकदा अधोरेखित झाले.











