मुळदे गावात कृषीकन्यांकडून फणसाच्या वेफर्स बद्दल मार्गदर्शन

गृहिणींना दिली लघुउद्योगांबद्दल माहिती

कुडाळ : उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे मधील ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रम २०२४ अंतर्गत शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनासाठी आलेल्या कृषीकन्यांकडून बचत गटातील महिलांना कच्चा फणसापासून वेफर्स कसे बनवावे याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. या प्रात्यक्षिकाद्वारे महिलांना वेफर्स साठी कोणत्या स्थिती मधला फणस निवडावा व तत्पश्चात त्यावर करण्यात येणारी प्रक्रिया कृषीकन्यांकडून करून दाखवण्यात आली.

याचबरोबर तयार केलेल्या वेफर्सचे योग्य पद्धतीने पॅकिंग कसे करावे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. त्याचप्रमाणे वेफर्सची कुठे व कशी विक्री करावी व आपला धंदा कसा वाढवावा याबाबत अनेक कल्पना कृषीकन्यांकडून देण्यात आल्या.

या कार्यक्रमात बचत गटातील महिलांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद नोंदविला व कृषीकन्यांचे आभार मानले. अशाच प्रकारचे अनेक कार्यक्रम येणाऱ्या दिवसांमध्ये मुळदे, ता. कुडाळ मध्ये ह्या कृषीकन्यांकडून पार पडतील असे सांगितले.

सदर गटामध्ये मनिषा सावंत, रुचिता देऊलकर, उर्मी वालावलकर, रसिका साबळे, ग्रीष्मा कुबल आणि नेहा धरणे या विद्यार्थिनींचा समावेश आहे.