कुडाळ शहरात मोकाट गाईगुरे पकडण्याची मोहीम

नागरिकांनी आपल्या गुरांची योग्य ती काळजी घेऊन त्यांना मोकाट सोडू नये

नगरपंचायतीने केले प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आवाहन

कुडाळ :कुडाळ शहर तसेच शहरालगतच्या परिसरात मोकाट गाई-म्हशी मोठ्या प्रमाणावर फिरत असल्यामुळे वाहतुकीस अडथळे निर्माण होत असून अपघातांची शक्यता वाढली आहे. यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर कुडाळ नगरपंचायतीमार्फत दिनांक २२ जानेवारी २०२६ पासून शहरातील मोकाट गाईगुरे पकडण्याची विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती नगरपंचायतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

कोंडवाडा अधिनियमानुसार पकडण्यात आलेली मोकाट गाईगुरे सरसोलीधाम येथील गोशाळेत ठेवण्याचा निर्णय नगरपंचायतीने घेतला आहे. सदर गुरे पकडल्यानंतर गोशाळेची फी तसेच गुरांच्या देखभालीसाठी झालेला खर्च संबंधित मालकांकडून वसूल करण्यात येणार आहे.

तसेच संबंधित मालकांनी विहित मुदतीत आपली गुरे ताब्यात न घेतल्यास नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम १९८५ मधील तरतुदीनुसार योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचेही नगरपंचायतीने स्पष्ट केले आहे.

कुडाळ शहर व परिसरातील गाई-म्हशी बाळगणाऱ्या नागरिकांनी आपल्या गुरांची योग्य ती काळजी घेऊन त्यांना मोकाट सोडू नये, असे आवाहन नगरपंचायतीने केले आहे.