विविध स्पर्धा व समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन
सावंतवाडी । प्रतिनिधी : सह्याद्री फाउंडेशनचा ‘मान्सून महोत्सव २०२४ ‘ हा यावर्षी २७ जुलै ते १९ ऑगस्ट या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. या मान्सून महोत्सवात दरवर्षीप्रमाणे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यात वक्तृत्व स्पर्धा, सुदृढ बालक स्पर्धा, भक्ती गीत गायन स्पर्धा, रानभाज्या स्पर्धा, गरजू विद्यार्थ्यांना मदत, शैक्षणिक साहित्य वाटप, दशावतार नाट्य मंडळांना आर्थिक मदत अशा विविध उपक्रम राबविले जाणार आहेत, असे सह्याद्री फाउंडेशनच्या आज झालेल्या बैठकीत निश्चित करण्यात आले. याबाबतची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुनील राऊळ व माजी अध्यक्ष संजू परब यांनी दिली. सैनिक पतसंस्थेच्या शहर कार्यालयात सुनिल राऊळ यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली.
यावेळी सह्याद्री फाउंडेशनचे अध्यक्ष रवींद्र मडगावकर, माजी अध्यक्ष संजू परब, सचिव प्रताप परब, विजय चव्हाण, संतोष सावंत, प्रल्हाद तावडे, माजी सभापती प्रमोद सावंत, विभावरी सुकी, हर्षवर्धन धारणकर, सुहास सावंत, संजय मडगावकर आदी उपस्थित होते.
मान्सून महोत्सवचा शुभारंभ २७ जूलै रोजी सह्याद्री पट्ट्यात वकृत्व स्पर्धा व शैक्षणिक साहित्य वाटप गुणवंत विद्यार्थी गौरव या कार्यक्रमाने कलंबिस्त पंचक्रोशीत घेण्यात येणार आहे. तर १९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता सावंतवाडी नगरपालिकेच्या सभागृहात स्पर्धांचे बक्षीस वितरण कार्यक्रमाने समारोप केला जाणार आहे.
यानिमित्त विविध कार्यक्रमा आयोजित करण्यात आले असून यात शैक्षणिक साहित्य वाटप २७ जुलै पासून ते तीन ऑगस्ट पर्यंत आयोजित करण्यात येणार आहे. तर ४ ऑगस्ट ला सावंतवाडी आदिनारायण मंगल कार्यालय येथे सकाळी ११ वाजता सुदृढ बालक स्पर्धा तर ११ ऑगस्टला सायंकाळी ४ वाजता रान भाजी स्पर्धा आदिनारायण मंगल कार्यालय येथे होणार आहे. १८ ऑगस्टला भक्तिगीत गायन स्पर्धा सायंकाळी ४ ते रात्री ८ या कालावधीत विठ्ठल मंदिर सावंतवाडी येथे तर २७ जुलै रोजी सकाळी ९ वाजता कलंबिस्त हायस्कूल येथे सह्याद्री पट्ट्यातील शालेय स्तरावर वकृत्व स्पर्धा व त्यानंतर महोत्सवाचा शुभारंभ होणार आहे. तर १९ ऑगस्टला महोत्सवाचा समारोप केला जाणार आहे. यावेळी दशावतार कलाकार आणि दशावतार कंपनींना आर्थिक मदत केली जाणार आहे.
दरम्यान, वकृत्व स्पर्धा २७ जुलैला होणार असून यासाठी इच्छुकांनी आपली नावे कलंबिस्त हायस्कूल मुख्याध्यापक अभिजीत जाधव यांच्याकडे नोंदवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.












