पाटपन्हाळे महाविद्यालयात दोन दिवशीय कार्यशाळा उत्साहात संपन्न

पाटपन्हाळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी अनुभवले मार्केटिंगचे प्रशिक्षण

गुहागर | प्रतिनिधी : गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयांमध्ये स्किल बिल्डिंग इंडिया या कार्यक्रमाअंतर्गत दोन दिवसांची कार्यशाळा 18 आणि 19 जुलै रोजी उत्साहात संपन्न झाली. या कार्यशाळेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी ए देसाई यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या कार्यशाळेमध्ये एकूण 70 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. ही कार्यशाळा पाटपन्हाळे महाविद्यालय आणि वाय फोर डी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आली. वाय फोर डी ही संस्था कोकाकोला या कंपनीची भागीदारी कंपनी आहे. या कंपनीबरोबर महाविद्यालयाने नुकताच एक सामंजस्य करार केला असून सामंजस्य कराराच्या माध्यमातून या दोन दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण भागातील युवकांच्या मध्ये प्रामुख्याने कौशल्य विकास व्हावा यासाठी या कार्यशाळेमध्ये विशेष भर देण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने विक्री आणि मार्केटिंगचे प्रशिक्षण देण्यात आले. वाय फोर डी या संस्थेचे प्रोजेक्ट मॅनेजर श्री शामकांत गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर असे प्रशिक्षण दिले.

 

 

 

सध्याचे मार्केटिंग नेमके कसे आहे तसेच त्यामध्ये कशाप्रकारे बदल होत आहेत आणि विद्यार्थ्यांनी यामध्ये करिअर करावयाच्या असल्यास कोणत्या गोष्टी कराव्यात की जेणेकरून कोणत्याही व्यवसायामध्ये सेल्स आणि मार्केटिंग साठी अडचण येणार नाही तसेच कोकणातील विविध पदार्थ किंवा वस्तू यांचे सहजरित्या मार्केटिंग विद्यार्थ्यांना कसे करता येईल तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मार्केटिंग मध्ये कसा प्रभावीपणे केला जातो याचे देखील प्रशिक्षण दिले. यामध्ये मार्केट रिसर्च, संदेशवहन कौशल्य, डिजिटल मार्केटिंग, वस्तूचे सादरीकरण, विक्रीची तंत्रे आणि धोरणे, ग्राहक संबंध व्यवस्थापन, विक्री नियोजन आणि एखाद्या वस्तूचे ब्रॅण्डिंग कसे करावे याचे या संदर्भात सविस्तर प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले गेले. वाणिज्य विभागातर्फे या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ही कार्यशाळा संपल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्यास प्रत्येक विद्यार्थ्यास सहभाग प्रमाणपत्र देखील देण्यात आले. ही कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. एस एस खोत, प्रा. कांचन कदम आणि एस एस चौगुले मॅडम यांनी विशेष प्रयत्न केले