कवी बसवंत थरकार यांच्या “नवी पहाट “कविता संग्रहास उत्कृष्ट कवितासंग्रह पुरस्कारने सन्मानीत.

गुहागर | प्रतिनिधी ; राजयुवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य व राजयुवा प्रकाशन पुणे या संस्थेतर्फे कवी बसवंत थरकार यांच्या “नवी पहाट” या पहिल्याच कविता संग्रहास उत्कृष्ट कवितासंग्रह पुरस्कार 2024 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

 

 

राजयुवा प्रतिष्ठान व राजयुवा प्रकाशन संस्थेतर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन मालधक्का चौक पुणे येथे आयोजित पुरस्कार वितरण समारंभात जेष्ठ साहित्यिक शरदच्चंद्र काकडे-देशमुख यांच्या हस्ते कवी बसवंत थरकार यांना गौरविण्यात आले. आयोजकांना परीक्षणासाठी एकूण सत्तर कवितासंग्रह प्राप्त झाले होते. त्यातून चार कवितासंग्रहांची उत्कृष्ट कवितासंग्रह पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती, त्या मध्ये “नवी पहाट” या कविता संग्रहाचा समावेश होता. पुरस्कार वितरण समारंभासाठी अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध गीतकार संजय वेदपाठक तर उद्घाटक म्हणून प्रा. डॉ शैलेंद्र भणगे, जेष्ठ साहित्यिका ललिता श्रीपाल सबनीस, निर्माता व सिने अभिनेता रविंद्र बाराथे, वन विभाग लेखापाल,लक्ष्मण शिंदे, जेष्ठ साहित्यिक शरदच्चंद्र काकडे-देशमुख आदी मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रातील सुमारे पंधरा साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरण मित्र वगैरेंचा आकर्षक सन्मानचिन्ह, पदक, सन्मानपत्र व शाल देऊन गौरविण्यात आले.

 

 

साहित्य, कला, सामाजिक तसेच सांस्कृतिक क्षेत्रात देत असलेले योगदान अनमोल असून विशेषतः साहित्य क्षेत्रातील गुणवत्तेबद्दल आदर आणि गुणांची कदर करुन साहित्यिकांच्या साहित्य कृतीस पुरस्कार प्रदान करत असल्याचे तसेच या मुळे संयोजकांना विशेष आनंद होत आहे. हा पुरस्कार म्हणजे समाजाच्या हितासाठी निःस्वार्थ पुणे करत असलेल्या प्रतिभाशाली साहित्यिक कार्याचा सन्मान आहे तसेच साहित्यिक कार्याचा व साहित्य कृतीचा गौरव म्हणून हा पुरस्कार प्रदान केला जात असल्याचे या वेळी सांगण्यात आले. व्यासपीठावरील मान्यवर साहित्यिकांनी आयोजक गौरव पुंडे, योगेश हरणे यांच्याया उपक्रमाचे तोंड भरुन कौतुक करुन या पुढे देखील त्यांच्या कार्यक्रमासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

 

 

 

कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात सुमारे पन्नास निमंत्रित कवींसाठी कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी कवी बसवंत थरकार यांनी सादर केलेल्या “माझं मला” या कवितेला काव्य रसिकांची उत्कृष्ट दाद मिळाली. त्या बद्दल त्यांना आकर्षक स्मृती चिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिध्देश उतेकर व सौ रोहिणी डाके तसेच गौरव पुंडे यांनी तर कवी योगेश हरणे यांनी आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाचा समारोप केला.