पालशेत:(वार्ताहर) गुहागर तालुक्यातील पालशेत येथील सुप्रसिद्ध भजनी बुवा महेश नरहर होळंब यांना “रत्नागिरी संगीतरत्न”पुरस्काराने समारंभपूर्वक सन्मानित करण्यात आले.अलीकडेच श्री.देवी वरातीच्या महापूजा सोहळ्यानिमित्त आयोजित राज्यस्तरीय निमंत्रित पंचरंगी भजन स्पर्धेमध्ये महेश बुवा होळंब यांच्या सुरेल भजन सादरीकरणाने परीक्षक आणि रसिकांना मंत्रमुग्ध केले.
या स्पर्धेमध्ये श्री. दत्त प्रासादिक भजन मंडळ पालशेत,श्री.देव रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ पिंगळी,श्री.दत्तगुरु प्रासादिक भजन मंडळ वैभव वाडी, मूळपुरुष प्रासादिक भजन मंडळ तुळस,वडखळ वेंगुर्ला,श्री.दत्तकृपा प्रासादिक भजन मंडळ वैभववाडी.आदी भजन मंडळांना निमंत्रित करण्यात आले होते.रत्नागिरी जिल्ह्यातून केवळ गुहागर तालुक्यातील पालशेतच्या श्री.दत्त प्रासादिक भजन मंडळाला निमंत्रित करण्यात आले होते.या स्पर्धेचे परीक्षण श्री.अमित गोसावीबुवा सिंधुदुर्ग आणि श्री.संदीप मेस्त्री बुवा सिंधुदुर्ग यांनी केले.
गेली ३५ वर्षे श्री.दत्त प्रासादिक भजन मंडळाच्या माध्यमातून श्री. महेशबुवा होळंब आपल्या सुमधुर सादरीकरणातून समाज प्रबोधन करत आहेत.महाराष्ट्राच्या महान संस्कृती तथा परंपरांचे जतन आणि प्रसार अविरतपणे करत आहेत.मधुर आवाज आणि ओघवत्या संभाषण कौशल्याने त्यांचे भजन हृदयस्पर्शी होते तसेच ते परिणामकारक आणि प्रेक्षणीय ठरते.
आजवर विविध भजन स्पर्धांमध्ये असंख्य पारितोषिके मिळविलेल्या श्री.महेश बुवांचे या स्पर्धेतील भजनही आपली विशेष छाप पाडत परिक्षक आणि तमाम भजन रसिकांना मोहून गेले.त्यांच्या या संगीत भजन क्षेत्रातील विशेष सांगीतिक कलेची दखल घेऊन श्री.देवी वराती देवस्थान युवा मंडळाने,परीक्षकांनी त्यांना “रत्नागिरी संगीतरत्न”पुरस्काराने समारंभपूर्वक सन्मानित केले.त्यांना लाभलेल्या या पुरस्काराने गुहागर तालुका भजनी मंडळांच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.राज्यस्तरीय निमंत्रित पंचरंगी भजन स्पर्धेतील महेश बुवा होळंब यांच्या या यशाबद्दल त्यांचे भजन रसिकांसह जिल्यातील विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.











