बोरघरमधील आदिवासींना शिवसेना नेते रामदास कदम यांनी दिला दिलासा

खेड(प्रतिनिधी) तालुक्यात झालेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीचा मोठा तडाखा बोरघर- आदिवासीवाडीला बसला. बोरघर व नातूनगर नदीच्या पुराचे पाणी आदिवासीतील घरांमध्ये घुसल्याने कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. शिवसेना नेते व माजी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी तातडीने बोरघर गाठत नुकसानाची पाहणी
केली.
आदिवासी कुटुंबीयांचे नवीन जागेत   पुनर्वसन करून सोयीसुविधा उपलब्ध करून अधिकाऱ्यांना देण्याच्या सूचनाही केल्या.
बोरघर व नातूनगर नदीच्या पुराचा सर्वाधिक फटका आदिवासीवाडीला बसला असून ग्रामस्थांची मोठी हानी झाली आहे. पूरस्थिती ओसरल्यानंतर माजी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी नुकसानीची पाहणी करत पूरग्रस्तांना धीर दिला. सर्व आदिवासी कुटुंबीयांना अन्नधान्याचेही वितरण केले. या कुटुंबीयांचे नवीन जागेत पुनर्वसन करण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. आदिवासी कुटुंबीयांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासनही दिले.
या प्रसंगी जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, तालुकाप्रमुख सचिन धाडवे, जि. प. माजी सदस्य अरुण कदम, माजी सभापती रामचंद्र आईनकर, तहसीलदार सुधीर सोनावणे, गटविकास अधिकारी यशवंत भांड, यांसह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.