वेंगुर्ले – रत्नागिरी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशाचा अज्ञात चोरट्याने मोबाईल केला लंपास
कणकवली : कणकवली बस स्थानकात शुक्रवारी सकाळी ८ वा. १० मी. च्या सुमारास कणकवली पंचायत समिती शिक्षण विभागातील भाऊसाहेब रामचंद्र कापसे ( रा. कणकवली वय – ४४ ) हे काही कामानिमित्त कणकवली येथून वेंगुर्ले – रत्नागिरी बसने साळीस्ते येथे चालले होते.
दरम्यान कणकवली बस स्थानकात आल्यावर त्यांना एक फोन आला. त्या फोनवर बोलून झाल्यावर त्यांनी आपला मोबाईल खिशात ठेवला व बस मध्ये चढले. दरम्यान बस मध्ये चढताना त्या ठिकाणी गर्दी झाली व बस मध्ये जाऊन बघितल्यावर त्यांच्या खिशात मोबाईल नसल्याचे श्री. कापसे यांच्या लक्षात आले.
दरम्यान कणकवली बस स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, सीसीटीव्ही फुटेज मध्ये देखील त्या दरम्यानचा व्हिडिओ कट असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. एकंदरीत कणकवली बस स्थानकात वारंवार चोऱ्यांचे सत्र सुरू झाले असून नियंत्रणासाठी ठेवलेले सीसीटीव्ही कॅमेरे देखील बंद अवस्थेत आहेत की काय ? अशी चर्चा देखील होऊ लागली आहे. त्यानंतर श्री. कापसे यांनी कणकवली पोलीस ठाण्यात धाव घेतली व घडलेला प्रकार सांगून कणकवली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.