लांजा( प्रतिनिधी)दक्षिण कोरिया येथे होणाऱ्या आशियाई आंतरराष्ट्रीय रनिंग स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाल्याबद्दल पदवीधर शिक्षक संघटना तसेच लांजा हायस्कूलच्या १९९० च्या दहावीच्या ग्रुपच्या वतीने तालुक्यातील वेरवली बुद्रुक गावचे सुपुत्र निलेश कुळये याचा सत्कार करण्यात आला व त्यांना भावी स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
श्री.निलेश कुळये याची आर्थिक स्थिती बेताची असल्याने त्यांनी या स्पर्धेला जाण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले होते.या आवाहनाला प्रतिसाद देत पदवीधर शिक्षक संघटना व दहावीच्या ग्रुपच्या वतीने श्री.कुळये यांना अकरा हजार रुपये रोख रक्कम देण्यात आली.
यावेळी पदवीधर शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पावसकर, तालुकाध्यक्ष संजय डांगे,माजी तालुकाध्यक्ष मनोहर म्हादये,माजी सरचिटणीस उदय घाडी, कोषाध्यक्ष प्रकाश जाधव अमित गराडे, दयानंद लाखण, सुधीर जाधव,शशिकांत बंडबे, मंगेश सरदेसाई, रामचंद्र तुळसणकर, दहावीच्या ग्रुपचे सुदेश देवळेकर, रविंद्र निवळे आदी उपस्थित होते.












