रिंगणे – झर्ये- कोंडगे, कुरंग या रस्त्याची दुरावस्था 

 

 

खड्ड्यात पाणी साचून रस्त्याला तळ्याचे स्वरूप, वाहन चालक हैराण 

लांजा (प्रतिनिधी ) तालुक्यातील रिंगणे – झर्ये- कोंडगे, कुरंग या रस्त्याची दुरावस्था झाली असून मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.तर काही ठिकाणी खड्ड्यात पाणी साचून रस्त्याला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे वाहनचालक, ग्रामस्थांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे

रिंगणे – झर्ये हा रस्ता रिंगणे, कोंडगे, कुरंग व झर्ये या चार गावांना तालुक्याशी जोडतो. हा रस्ता १२ वर्षांपूर्वी पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत नव्याने बांधण्यात आला होता. सध्या या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनिय झाली असुन रिंगणे, कोंडगे, कुरंग व झर्ये गावां मध्ये ठिक – ठिकाणी या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. कुरंग येथील नावेरी नदीवरील पुलाजवळ तर भलेमोठे खड्डे पडले आहेत. येथुन वाहन नेताना विशेष मेहनत घ्यावी लागते. रोज येथुन ये – जा करणार्याना कसरत करावी लागत आहे.

सध्या पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पडलेल्या खड्डयात पाणी साचून रस्त्याला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. यामुळे वाहनचारकांच्या अडचणी मध्ये अजूनच भर पडली आहे. मान्सून पुर्व तयारी अंतर्गत डबर टाकून या रस्त्यावरील खड्डे भरण्यात आले होते. यातून थोडासा दिलासा मिळेल अशी आशा होती. परंतु डबर टाकल्याने रस्त्याची अजूनच दुरावस्था झाली आहे. या रस्त्याची दुर्दशा पाहता लवकरात लवकर डागडुजीची गरज आहे.

दरम्यान ग्रामस्थांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन पुढील आठ दिवसात रिंगणे – झर्ये रस्त्याची डागडुजी करावी अन्यथा सोमवार दि. २९ जुलै रोजी उपोषणासह रास्तारोखो आंदोलन करणार असल्याचा इशारा कुरंग येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश सुर्वे यानी निवेदनाद्वारे दिला आहे.

 

दरम्यान, गणेश सुर्वे यांनी उपोषण व रास्तारोखो आंदोलना बाबत निवेदन जिल्हाधिकारी, गटविकास अधिकारी, तहसीलदार लांजा, पंचायत समिती सभापती, एस. टी. आगार व्यवस्थापक व रिंगणे, कोंडगे, कुरंग व झर्ये या चारही ग्रामपंचायतींना दिले असुन प्रशासनाला रस्ता डागडुजीसाठी आठ दिवसांचा अवधी ही दिला आहे. ढिम्म प्रशासनाला आता तरी जाग येईल आणी या रस्त्यावरील खड्डे भरले जातील अशी आशा गणेश सुर्वे यांनी व्यक्त केली आहे.