देवगड तालुक्याला कायमस्वरूपी गटशिक्षण अधिकारी द्यावा.रिक्त विस्तार अधिकारी पदे भरण्यात यावीत 

 

 

नगरपंचायत हद्दीतील जिल्हा परिषद शाळेची मागील मागील थकबाकी सहित पाणीपट्टी माफ करावी

महाराष्ट्र पुरोगामी प्राथ शिक्षक संघटनेचे आमदार नितेश राणे यांना विविध धोरणात्मक विषयांबाबत निवेदन

देवगड (प्रतिनिधी)   महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती संघटना सिंधुदुर्ग यांनी आमदार नितेश राणे यांची कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी भेट घेत विविध शैक्षणिक धोरणात्मक विषयांवर चर्चा केली. देवगड तालुका हा शिक्षणाचे महत्त्वाचे केंद्र मानले जाते. मात्र आज याच तालुक्यातील पंचायत समिती शिक्षण विभागाला कायमस्वरूपी गटशिक्षणाधिकारी नाही. आतापर्यंत प्रभारी गटशिक्षणाधिकारी म्हणूनच सर्वांनी काम पाहिले, तो कायमस्वरूपी मिळावा तसेच देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीतील जिल्हा परिषद शाळांचे सात वर्षा पासून चे थकित पाणीपट्टीचे बिल सुमारे २ लाख ७० हजार रुपये आहे. ते व यापुढील पाणीपट्टी बिलही माफ व्हावे या प्रमुख मागणी सह इतर विविध मागण्यांचे निवेदन आमदार नितेश राणे यांना महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक समिती सिंधुदुर्गच्या वतीने देण्यात आले .

या निवेदनात म्हटले आहे की, मुलींना शिक्षण प्रेरक म्हणून लागू असलेला १ रू उपस्थिती भत्ता किमान १० रू व्हावा. सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना ही सिंधुदुर्ग जिल्हा प्रमाणे राज्यात सुद्धा प्रभावीपणे राबण्यासाठी देणगीदारांना दिलेल्या रकमेवर इन्कम टॅक्समध्ये 80G खाली कर सवलत मिळावी. जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्याना विविध कला क्रीडा आणि जीवन कौशल्ये आत्मसात करण्यासाठी वेळ देता यावा यासाठी,जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा सोमवार ते शुक्रवार सकाळी ९.००ते ३.०० या वेळेत भराव्यात . सिंधुदुर्ग जिल्ह्यात कला अकादमी व क्रीडा अकादमी स्थापन व्हावी. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील शिक्षण विभागातील विविध रिक्त पदे भरण्यात यावीत.

मतदार संघातील इयत्ता १ ते ४ व ५ ते ८ चे वर्ग असलेल्या विशेषतः मोठ्या पटाच्या जिल्हा परिषद शाळांना व्हर्चुअल क्लासरूम मिळावेत अशी मागणी केली.

शासन निर्णयानुसार पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथी पर्यंतचे वर्ग सकाळी ९ नंतर भरविण्यात यावेत असे आदेशित आहे मात्र त्यात विशेषतः खासगी शाळा असे नमूद करण्यात आले आहे.ज्या सोमवार ते शनिवार दररोज सकाळ सत्रात भरतात.

आनंददायी शनिवार,कवायत प्रकार, योगासने यासारख्या आरोग्यदायी सवयी मुलांच्या अंगी बाणाव्या यासाठी शनिवारी सकाळी शाळा सुरू राहणे आवश्यक आहे. बदललेली वेळ मुलांना शारीरिक आणि मानसिक त्रासाची आहे .त्याच बरोबर अनेक पालकांनाही गैर सोयीची आहे. डोंगराळ जिल्हा असल्याने वेगळा निकष लावावा तसेच ऐन दुपारी मुलाना अवघड वाटेने जाणे धोकादायक होऊ शकते. यावर संघटनेने लक्ष वेधले.या सर्वाचा विचार होऊन शनिवारी शाळांची वेळ पूर्ववत करण्यात यावी अशी विनंती केली.त्याच बरोबर देवगड तालुक्याला नियमित गटशिक्षणाधिकारी मिळावेत विस्तार अधिकारी पदे भरण्यात यावीत अशी मागणी करताना रिक्त पदांची यादी दिली.या विषयी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याशी संपर्क साधून कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

वरील सर्व मागण्या पूर्ण होण्यासाठी आपण प्रयत्न करावे अशी विनंती संघटनेने केली असता या सर्व मागण्या अत्यंत महत्वाच्या असून शासन दरबारी नक्की प्रयत्न करू असे आश्वासन त्यांनी दिले.अशी माहिती जिल्हाध्यक्ष सचिन जाधव यांनी प्रसार माध्यमांना दिली यावेळी

देवगड तालुकाध्यक्ष आनंद जाधव उपस्थित होते.