अधिकचे मनुष्य बाळू उपलब्ध करून वीज वितरण त्वरीत सुरळीत करा 

 

 

आढावा बैठकीत मंत्री दीपक केसरकर यांच्या महावितरणच्या अधिकाऱ्यांना सूचना 

आयटीआय प्रशिक्षित विद्यार्थ्यांना कंत्राटी स्वरूपात भरती करण्याचे निर्देश 

कामचुकारपणा करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करा 

सावंतवाडी । प्रतिनिधी : महावितरण कंपनीने अधिकचे मनुष्यबळ उपलब्ध करून विजेचा खेळखंडोबा दूर करून वीज वितरण सुरळीतपणे चालू राहील याची काळजी घ्यावी. यासाठी आयटीआय प्रशिक्षित विद्यार्थ्यांना कंत्राटी पद्धतीने भरती करून पर्यायी व्यवस्था करावी. सब स्टेशनवर वाहन नसेल तर आजच ते भाडेतत्त्वावर घेऊन सुविधा उपलब्ध करून द्या. वाहनाचे भाडे मी स्वतः देईन पण वीजेच्या लपंडावातून जनतेची त्वरीत सुटका करावी, अशा निर्देश शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी दिले.

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील पूरसदृष्य परिस्थिती व विजेच्या समस्या याबाबत मंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली येथील नगरपालिका सभागृहात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी किशोर तावडे, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, सावंतवाडीचे प्रांताधिकारी हेमंत निकम, उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे, तहसिलदार श्रीधर पाटील आदी उपस्थित होते.

मंत्री दीपक केसरकर म्हणाले, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील

लोकांना महावितरण विभागाकडून चांगली सुविधा द्या. गावागावात निर्माण झालेली समस्या लक्षात घेता गरज पडल्यास अन्य जिल्ह्यातील कुमक आणून विज पुरवठा सुरळीत करा. सध्या गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर गणेश मूर्तींचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे गावागावात चांगली सेवा देणे शक्य व्हावे यासाठी प्रत्येक उपकेंद्रावर भाड्याच्या गाड्या घ्या. तसेच झाडे तोडण्यासाठी आवश्यक असलेली कटर खरेदी करा. अधिकारी आणि कर्मचारी फोन बंद करून ठेवत असतील तसेच कामचुकारपणा करत असतील त्यांच्यावर थेट कारवाई करा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

वादळी वारा व पावसाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी विद्युत खांब तसेच झाडे पडल्यामुळे जिल्ह्यात निर्माण झालेल्या विजेच्या समस्या लक्षात घेता महावितरणकडे कर्मचाऱ्यांची कमतरता जाणवत असल्याचे अधिकाऱ्यांनी मंत्री दीपक केसरकर यांच्या निदर्शनास आणून दिले. यावर आयटीआय झालेली मुले कंत्राटी पध्दतीवर वीज कंपनीत भरती करुन घेणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. जिल्हाधिकारी किशोर तावडे यांना त्यांनी तसे निर्देश दिले.

सावंतवाडी विधानसभा मतदार संघात अनेक गावात ८ ते १० दिवस वीज पुरवठा खंडीत आहे. त्यामुळ ग्रामस्थांतून उद्रेक आहे. या पार्श्वभूमीवर योग्य ते नियोजन करण्यासाठी श्री. केसरकर यांनी आज या ठिकाणी आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी उपस्थित अधिकार्‍यांशी चर्चा करत आवश्यक सुचना दिल्या.

यावेळी केसरकर म्हणाले, या ठिकाणी कामगार नाही, साहित्य नाही, असे सांगून कामचुकारपणा करू नका. ग्रामस्थांना चांगली सेवा द्या, फक्त कारणे देवून आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करू नका, असे सांगत आत्ताच तुम्ही हे नाही ते नाही असे सांगता मग पावसाळ्या आधी नेमके नियोजन काय केलात असा सवाल त्यांनी उपस्थितीत करीत अधिकार्‍यांना धारेवर धरले. तसेच यावेळी ग्रामीण भागात अनेक ठिकाणी झाडे तुटल्यामुळे पोल आणि वीज वाहिन्या तुटल्या आहेत. त्या तात्काळ पुर्ववत करण्यासाठी बाहेरच्या जिल्ह्यातून मदत घ्या आणि तात्काळ सेवा देता यावी यासाठी आपण स्वखर्चातून प्रत्येक उपकेंद्रात गाडी उपलब्ध करुन देतो, असे त्यांनी सांगितले. तसेच झाडे तोडण्यासाठी २० कटर खरेदी करण्यासाठी तात्काळ आमदार निधीतून पैसे द्या, अशा सुचना त्यांनी यावेळी दिल्या.

यावेळी उपस्थित अधिकार्‍यांची त्यांनी झाडाझडती घेतली. काही झाले तरी लोकांना चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजेत. ज्या गावात वीजेच्या समस्या आहेत त्या ठिकाणी स्थानिक लोक मदत करीत आहे. परंतू लोक आक्रमक होणार नाहीत याची खबरदारी घ्या आणि तात्काळ त्यांना सेवा द्या, असे त्यांनी उपस्थित अधिकार्‍यांना सांगितले. तसेच मुंबई-गोवा महामार्ग खराब झाला आहे. काही ठिकाणी पाणी तुंबण्याचे प्रकार होत आहे. त्याबाबत योग्य ते नियोजन करा. आंबोलीसह अन्य घाटात झाडे धोकादायक आहेत ती कोसळून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे वनविभाग आणि बांधकामच्या अधिकार्‍यांनी नियोजन करून ती झाडे तोडावीत, असे ते म्हणाले.

सावंतवाडी शहरात यावर्षी करण्यात आलेले रस्ते खड्डेमय झाले आहेत. त्यामुळे संबंधित ठेकेदाराकडुन ते तात्काळ परत करुन घेण्यात यावेत अशा सूचना त्यांनी पालिकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी साळुंखे यांना केल्या. मागच्यावर्षी राबविण्यात आलेल्या गाळ काढण्याच्या मोहिमेमुळे माडखोल, धवडकी आणि विलवडे येथे यावर्षी पुर आला नाही. त्यामुळे हीच मोहीम आता बांदा शहरात राबविणण्यात येणार आहे.

 

बांदा पुरमुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यासाठी तेरेखाल पात्रातील गाळ काढण्यात येणार आहे. चतुर्थी पुर्वी जिल्ह्यातील अंतर्गत रस्ते आणि महामार्ग सुस्थितीत करण्याच्या सुचना प्रशासनाला दिल्या आहेत. आज झालेल्या आढावा बैठकीत यावर आढावा घेण्यात आला. मुख्य म्हणजे आठवड्यानंतर पुन्हा यावर बैठक घेवून चर्चा करण्यात येणार आहे, असे ते म्हणाले.

यावेळी सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता महेंद्र किणी, तहसीलदार श्रीधर पाटील,शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, विधानसभा अध्यक्ष प्रेमानंद देसाई, तालुकाप्रमुख बबन राणे, दोडामार्ग तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, वेंगुर्ले तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर,तारकेश सावंत, रूपेश पावसकर व अधिकारी उपस्थित होते.