सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी रेडी मार्गावरील मळगाव घाटी अनेक झाडे कधीही रस्त्यावर कोसळण्याच्या मार्गावर आहेत. त्यातच मोठ्या वळणावरील म्हणजेच धबधब्यालगत एका झाडाखालील माती कोसळली असून हे झाड देखील कधीही कोसळू शकते. त्यामुळे अघटित घटना घडण्यापूर्वी सदरचे झाड तोडून बाजूला करावे अशी मागणी वाहनधारकांमधून होत आहे.
मळगांव घाटीत धोकादायक परिस्थितीत असलेली काही झाडे पावसाळ्यापूर्वी तोडण्यात आली होती. मात्र, अजूनही काही झाडे अक्षरशः कधीही कोसळणार अशा परिस्थितीत असून त्यामुळे वाहनधारकांसमोर मृत्यूची टांगती तलवार उभी ठाकली आहे. सद्यस्थितीत कोसळणारा मुसळधार पाऊस व सोसाट्याचा वारा यामुळे या झाडांपासून धोका निर्माण झाला असून सदरची झाडे त्वरित कापून दूर करावी अशी मागणी होत आहे.












