जाळ्यात अडकलेल्या खवले मांजराची सुटका!

मसुरे | झुंजार पेडणेकर : मौजे कांदळगाव येथे जाळ्यात अडकलेल्या खवले मांजराची सुटका करून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. खवले मांजर जाळ्यात अडकले असल्याची माहिती संतोष पारकर, स्वप्निल गोसावी यांनी परीमंडळ वन अधिकारी मालवणचे श्रीकृष्ण परीट यांना दिली.

 

 

 

वनविभागाचे अधिकारी कर्मचारी प्रत्यक्ष जागेवर जाऊन खवले मांजर ताब्यात घेतले. सदर खवले मांजर संतोष पारकर गुरे चारण्यासाठी गेले असता त्याच्या नजरेस पडले. त्यांनी सदरची घटना पार्थ डिचवलकर यांना सांगून वनकर्मचारी यांच्या मदतीने खवले मांजराची सुखरूप सुटका करून वनपाल मालवण श्रीकृष्ण परीट यांचे ताब्यात दिले. खवले मांजर जैवविविधतेतील महत्त्वाचा घटक असून समाजात असलेल्या गैरसमजामुळे दुर्मिळ होत चाललेली वन्य जीवांची प्रजात आहे. खवले मांजर वन्यजीव अधिनियम 1972 मधील शेड्युल एक मध्ये असून त्याला डिवचने पकडणे त्याची शिकार करणे हा गुन्हा आहे. असे श्रीकृष्ण परिट म्हणाले. सदरचे बचाव कार्य उपवनसंरक्षक श्री नवकिशोर रेड्डी, सहाय्यक वनसंरक्षक श्री सुनील लाड, वनक्षेत्रपाल कुडाळ श्री.संदीप कुंभार यांचे मार्गदर्शनाखाली श्रीकृष्ण परीट परिमंडळ वन अधिकारी मालवण, अनिल परब वनकर्मचारी, ग्रामस्थ संतोष पारकर, पार्थ डीच्वलकर, नारायण मेस्त्री, लवेश आयकर तसेच युथ बिट्स फॉर क्लायमेट चे सदस्य स्वप्निल गोसावी, दर्शन वेंगुर्लेकर यांचे उपस्थित पार पडले.