बांदिवडे – भगवंतगडला जोडणाऱ्या पुलासाठी ६.६९ कोटींचा निधी मंजूर!

खा. नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह भाजपा नेते निलेश राणेंचे विशेष प्रयत्न : भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांची माहिती

मसूरे | झुंजार पेडणेकर : मालवण तालुक्यातील मसुरे, चिंदर, बांदिवडे गावातील ग्रामस्थांची अनेक वर्षांपासून मागणी असलेल्या बांदिवडे – भगवंतगड जोडणाऱ्या नवीन पुलास मंजूरी मिळाली आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या हिश्यातून या पुलासाठी ६ कोटी ६९ लाख ८९ हजारांचा निधी मंजूर करण्यात आला असून या पुलामुळे येथील ग्रामस्थांची मोठी गैरसोय दूर झाली आहे. या पुलासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री खा. नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह भाजपाचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख माजी खा. निलेश राणेंनी विशेष प्रयत्न केल्याची माहिती भाजपचे मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी दिली आहे.

 

 

आचरा – भगवंतगड मार्गावरील या ठिकाणी ब्रीज कम बंधारा होता. मात्र या बंधाऱ्या वरून पाणी जात असल्याने ग्रामस्थांची ये जा करताना मोठी गैरसोय होत होती. तसेच या बंधाऱ्याची मोठ्या प्रमाणात पडझड झाल्याने वाहतूक करणे धोक्याचे ठरत होते. शालेय विध्यार्थ्यांना सुद्धा पावसाळ्यात येथून प्रवास करणे जीवावर बेतणारे ठरायचे. मागील पंधरा दिवस पूर्वी पुर परिस्थितीत या बांधाऱ्याचा पृष्ठ भागावरील अर्धा भाग वाहून गेला होता तर दोन ठिकाणी हा बंधारा खचला होता. याठिकाणी मोठा पूल उभारण्याची मागणी तिन्ही गावातील ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतिकडून करण्यात येत होती. अखेर भाजप नेते निलेश राणे यांच्या विशेष प्रयत्नाने आणि खासदार नारायण राणे व पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या सौजन्याने हा ब्रीज मंजूर करण्यात आला आहे. या पुलासाठी मसूरे देवस्थान प्रमुख बाबुराव प्रभूगावकर यांनी सुद्धा शासनाचे वेळोवेळी लक्ष वेधले होते. या ब्रीजमुळे अनेक गावांना वाहतूक सुलभ होणार आहे. ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.