संकटकाळात मित्राच्या मदतीला आले वर्ग मित्र

 

सन १९९० ते १९९५ च्या बॅचच्या दोस्तीचा आदर्श

शिरगांव, ( प्रतिनिधी ) – २० जुलै रोजी पडणारा मुसळधार पाऊस आणि वादळी वारा सुरू असतानाच रात्रीच्या वेळेस देवगड तालुक्यातील कट्टा येथील महेश भाबल यांच्या राहत्या घरावर आंब्याचे झाड कोसळले. या संकट काळात वर्ग मित्र आपल्या मित्राच्या मदतीला धावून आले. देवगड येथील स.ह.केळकर महाविद्यालयातील सन १९९० ते १९९५ च्या बॅचने इतक्या वर्षांच्या दोस्तीतील नात्याचा आदर्श समाजासमोर उभा केला आहे.

महेश भाबल हे मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत असून त्यांची आर्थिक परिस्थिती बेताचीच आहे. त्यांच्या कुटूंबात स्वतः महेश ,मोठा भाऊ व त्याची पत्नीसह दोन मुले राहतात. २० जुलै रोजी ते रात्रीचे जेवण करत असतानाच त्यांच्या घरावर आंब्याचे मोठे झाड कोसळले. आणि घराचे छप्पर जमीनदोस्त झाले. फक्त भिंती शाबुत राहिल्या. या घटनेत जिवीत हानी झाली नसली तरी रात्रीच्या वेळी पावसाचा जोर कायम असल्यामुळे बाहेर पडणे मुश्किल झाले. या पावसात संसार उपयोगी साहित्य पुर्णतः भिजले. या दुर्दैवी घटनेची माहिती सगळीकडे पसरली. आणि हळूहळू मदतीचे हात पुढे सरसावले. याचवेळी देवगड येथील स. ह. केळकर महाविद्यालयातील सन १९९०-१९९५ मधील बॅचची मैञिण निलिम सारंग हिने मोबाईल वरुन हेमांगी तारी हिला हि घटना सांगितली. आणि व्हाट्सअप ग्रुप अँडमिन हेमांगी तारी हिने या घटनेची पोस्ट या बॅचच्या ग्रुपवर केल्यानंतर सर्व मित्रांनी महेश भाबल यांची आस्थेने विचारपूस केली व आपणांस जमेल तशी आर्थिक मदत मित्र राजू धुरी यांच्याजवळ जमा केली. हि जमा झालेली ५४ हजार सातशे अकरा रुपयांची मदत महेश भाबल यांना सुपूर्द करण्यात आली.

चौकट

३० वर्षानंतरही मित्रत्वाचे नाते सर्वांनी टिकवून ठेवताना आर्थिक सहाय्य केले. पडत्या काळात मायेचा आधार दिला. ही माझ्या संपूर्ण कुटुंबासाठी मोठी गोष्ट आहे. या मित्रांचे ऋण कायमस्वरूपी राहणार आहेत. असे महेश भाबल यांनी यावेळी सांगितले.