जेरुसलेम : इस्रायलची ‘मोसाद’ ही गुप्तहेर संघटना जगातील सर्वात मोठी गुप्तहेर संघटना मानली जाते. मोसादने आपला शत्रू हेरला की त्याचा काटा काढूनच ती शांत बसते. नुकतीच इराणची राजधानी असलेल्या तेहरानमध्ये घुसून मोसादने ‘हमास’ चा प्रमुख इस्माईल हानियाची हत्या केली आहे.
त्यासाठी इराणी सैन्यातच मोसादने घुसखोरी केली. इस्रायलने ज्या थंड डोक्याने, इराणच्या राजधानीचं शहर असलेल्या तेहरानमध्ये घुसून हमासचा प्रमुख इस्माईल हानियाची हत्या केली ते बघून सगळेच थक्क झाले आहेत. हानिया ज्या गेस्ट हाउसमघ्ये राहाणार होता तिथे दोन महिन्यांपूर्वीच बॉम्ब लावण्यात आला होता. कारण राष्ट्रपतींच्या शपथविधीला हानिया नक्की येणार आणि याच गेस्ट हाउसमध्ये राहाणार हे इस्रायलला माहिती होतं. विशेष म्हणजे या संपूर्ण मोहिमेत मोसादने इराणी एजंट्सनाच हाताशी धरल्यामुळे इराणी नेत्यांचं धाबं दणाणलं आहे.
‘टेलिग्राफ’ ने दिलेल्या वृत्तानुसार गेस्ट हाउसमध्ये बॉम्ब लावण्यासाठी मोसादने इराणी सैन्यातील एंजंट्सनाच हाताशी धरलं. खरं तर मे महिन्यात इराणचे माजी राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांच्या अंत्ययात्रेसाठी इस्माईल हानिया इराणला आला होता. मोसादने त्याचवेळी त्याचा काटा काढायचा निर्णय घेतला होता. मात्र, गर्दीमुळे त्यावेळी ही मोहीम पुढे ढकलण्यात आली. त्यावेळी मोहीम फसण्याची शक्यता अधिक असल्यामुळे ती पुढे ढकलण्यात आली होती, अशी माहिती दोन अधिकाऱ्यांनी ‘टेलिग्राफ’ला दिली.
बुधवारी रात्री हानिया जिथे झोपला होता तिथे मोठा स्फोट घडवून आणण्यात आला. त्यातच हानिया आणि त्याच्या सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाला. तीन वेगवेगळ्या खोल्यांमध्ये बॉम्ब लावण्यात आल्याची माहिती मोसादसाठी काम करणाऱ्या इराणी एजंट्सनी दिली. हानिया या पूर्वीही या गेस्ट हाउसमध्ये राहिला होता. त्यामुळे तो पुन्हा इथेच राहील असा मोसादचा अंदाज होता. ज्या खोल्यांमध्ये तो पूर्वी राहिला होता आणि ज्या खोल्यांमध्ये पुन्हा राहाण्याची शक्यता होती अशा तीन खोल्यांमध्ये मोसादकडून बॉम्ब लावण्यात आले होते.
इराणी अधिकाऱ्यांनी दाखवलेल्या सर्व्हेलन्स फुटेजमध्ये मोसादच्या एजंट्सनी अवघ्या मिनिटभरात गेस्ट हाउसमध्ये येऊन बॉम्ब लावले आणि ते बाहेर पडले. फक्त बाहेर पडले नाहीत तर ते इराणबाहेर निघून गेले. त्यानंतर बुधवारी मध्यरात्री दोन वाजता रिमोट कंट्रोलद्वारे बॉम्बचा स्फोट घडवून हानियाची हत्या करण्यात आली.












