रत्नागिरी : ‘कलांगण संगमेश्वर’ संस्थेतर्फे आयोजित आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेत साडवली येथील मीनाताई ठाकरे विद्यालयाच्या वेदांती राव या विद्यार्थिनीने विजेतेपद पटकावले.
स्पर्धेतील पहिले तीन क्रमांक पुढीलप्रमाणे –
१. वेदांती प्रदीप राव – मीनाताई ठाकरे विद्यालय, साडवली
२. प्रांजल प्रमोद गुरव – पैसा फंड इंग्लिश स्कूल, संगमेश्वर आणि ३. श्रेया कृष्णा मेस्त्री – न्यू इंग्लिश स्कूल, देवरुख
बुरंबी येथील दादासाहेब सरफरे विद्यालयात झालेल्या या स्पर्धेच्या यंदा दुसऱ्या वर्षी ‘साने गुरुजींच्या स्वप्नातील भारत’, ‘तुम्हाला रील्स बनवता येतात?’ ‘विकास म्हणजे काय रे भाऊ?’ आणि ‘स्वातंत्र्यवीर सावरकर – रत्नागिरी पर्व’ हे चार विषय स्पर्धकांना देण्यात आले. तालुक्यातील विविध शाळांच्या मिळून आठवी ते दहावी इयत्तेतील एकूण २८ विद्यार्थ्यांनी स्पर्धेत भाग घेतला.
स्पर्धेतील विजेत्या वेदांतीला दोन हजार रुपये, सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र, दुसरा क्रमांक मिळालेल्या प्रांजलला दीड हजार रुपये, पुस्तक व प्रशस्तीपत्र आणि तिसरा क्रमांक मिळालेल्या श्रेया हिला एक हजार रुपये, प्रशस्तीपत्र व पुस्तक भेट देऊन गौरवण्यात आले. स्पर्धेच्या समन्वयक संपदा जोगळेकर कुलकर्णी यांनी त्यांच्या मातोश्री कै. वृंदा जोगळेकर यांच्या स्मतीप्रीत्यर्थ ही पारितोषिके पुरस्कृत केली. या व्यतिरिक्त मीनाताई ठाकरे विद्यालयातील शिक्षक केतन भालचंद्र ब्रीद यांची ‘सर्वोत्तम मार्गदर्शक शिक्षक’ म्हणून निवड करण्यात आली. आर्ट सर्कल, रत्नागिरीचे अध्यक्ष नितीन कानविंदे आणि ज्येष्ठ पत्रकार सतीश कामत यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. बुरंबी पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष राजाराम गर्दे आणि शाळेचे मुख्याध्यापक वीरकर या प्रसंगी उपस्थित होते.
प्रसिद्ध निवेदक निबंध कानिटकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.












