मातोश्री पार्वती राऊत विद्यालय रेडी या शाळेचे संस्थापक परशुराम राऊत यांचे निधन

 

 

वेंगुर्ले l प्रतिनिधी :विद्या विकास एज्युकेशन सोसायटी व स्वामी रामानंद एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक संचालक तसेच मातोश्री पार्वती राऊत विद्यालय रेडी या शाळेचे संस्थापक, रेडी गावचे सुपुत्र परशुराम म. राऊत यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी वार्धक्याने नुकतेच निधन झाले.

रेडी गावाच्या सर्वांगीण विकासाची तळमळ असल्याने त्यांनी रेडी गावात इंग्रजी माध्यमाची शाळा व महाविद्यालयाची स्थापना केली. तसेच सन १९६२ मध्ये त्यांनी घाटकोपर – पंतनगर येथे विद्या विकास एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून शैक्षणिक कार्यास सुरुवात केली. विक्रोळी, घाटकोपर, वांगणी येथे शाळा व महाविद्यालये स्थापन करून तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण सेवा देण्याचा प्रयत्न केला. आज या सर्व शाळांचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे. आजमितीस सुमारे १० हजार विद्यार्थी या संस्थेंतर्गत शाळा व महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. त्यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन सन १९९४ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती डॉ. शंकर दयाळ शर्मा यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.