झाराप पत्रादेवी बायपासची अक्षरशः चाळण

 

वाहनधारकांची कसरत : अपघातांना निमंत्रण 

गणेशोत्सवापूर्वी खडडे बुजविण्याची मागणी 

सावंतवाडी । प्रतिनिधी : मुंबई गोवा महामार्गाच्या झाराप पत्रादेवी बायपासची पावसाळ्यात पडलेल्या खड्ड्यामुळे अक्षरशः चाळण झाली आहे. या खड्ड्यांमधून वाट काढताना वाहनधारकांची मोठी कसरत होत आहे. तर भर पावसात या भल्या मोठ्या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने खड्डे दिसून न आल्यामुळे अनेक अपघात होत आहेत. गणेशोत्सव तोंडावर आलेला असतानाही महामार्ग प्राधिकरणकडून याबाबत कोणतीही हालचाल होत नसल्याने गणेश चतुर्थी पूर्वी तरी या रस्त्यावरील खड्डे सिमेंट काँक्रीट ने बुजून संपूर्ण डागडुजी करण्यात यावी अशी मागणी होत आहे.

झाराप ते पत्रादेवी या मुंबई गोवा महामार्गाच्या बायपासवर भले मोठ्ठे खडडे पडले आहेत. दोन वर्षांपूर्वी या रस्त्याचे नूतनीकरण करण्यात आले होते. मात्र, गतवर्षी पहिल्याच पावसात पुन्हा खड्ड्यांचे साम्राज्य पसरले. पावसाळ्यानंतर स्थानिकांनी आंदोलनाचा इशारा दिल्यावर दिवाळीनंतर हे खड्डे डांबराने बुजविण्यात आले. मात्र, काही ठराविक ठिकाणीच हे खड्डे बुजविण्यात आले होते. पावसाळ्यापूर्वी संपूर्ण रस्त्याचे नूतनीकरण पुन्हा करण्यात येईल अशी माहिती त्यावेळी महामार्ग प्राधिकरणाने दिली होती.

मात्र, याबाबत कोणतीच कार्यवाही न झाल्याने यावर्षीच्या पहिल्याच पावसात केलेले डांबरीकरण अक्षरशः वाहून जात सर्व महामार्ग पुन्हा खड्डेमय झाला. सद्यस्थितीत या महामार्गावर दोन दोन फुटांचे खड्डे पडले असून वाहन धारकांना मोठी कसरत करत गाड्या चालवाव्या लागत आहेत. तर चुकाविण्याच्या नादात चालक आपली गाडी दुसऱ्या लेनवर नेत असल्याने अपघातांना सामोरे जावे लागत आहे.

पावसाळा सुरू झाल्यानंतर या महामार्गावर आतापर्यंत अनेक अपघात झाले असून त्याला हे खड्डेच जबाबदार आहेत. अनेक चार चाकी गाड्या या खड्ड्यामुळे नादुरुस्त झाल्या असून दुचाकीस्वारांना तर जीवावर उदार होऊन या खड्ड्यामधून मार्गक्रमण करावे लागत आहे. पाऊस सुरू असताना या खड्ड्यात पाणी भरल्यानंतर खड्ड्यांच्या खोलीचा अंदाज न आल्याने अनेक दुचाकी तसेच चार चाकी गाड्यांचे अपघात झाले आहेत.

काही दिवस दिवसांपूर्वी याबाबत दैनिक प्रहार मधून आवाज उठविल्यावर महामार्ग प्राधिकरणाने ठेकेदाराकरवी काही खड्ड्यांमध्ये सिमेंट काँक्रीट टाकून खड्ड्यावर मलमपट्टी करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतर झालेल्या पहिल्याच पावसात हे सर्व सिमेंट काँक्रीट वाहून गेले. मुख्य महामार्गाबरोबरच महामार्ग लगत असलेल्या सर्विस रोडची देखील याच पद्धतीने दुरावस्था झाली आहे. त्यामुळे हे सर्विस रोड वरील खड्डे टाळण्यासाठी वाहनधारकांना पर्यायी मार्गांचा अवलंब करावा लागत आहे. याबाबत वाहनधारकांमधून महामार्ग प्राधिकरण च्या विरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

आता गणेशोत्सव तोंडावर आला आहे.

त्यामुळे याच मार्गावरून अनेक लहान मोठ्या टेम्पो मधून गावोगावी नेल्या जाणार आहेत. गणेशोत्सवासाठी मुंबईकर चाकरमानी देखील मोठ्या प्रमाणात गावात दाखल होणार आहेत. त्यामुळे महामार्गावरील वर्दळ अधिकच वाढणार आहे. यासाठी गणेशोत्सवापूर्वी तरी या संपूर्ण महामार्गावरील खड्डे सिमेंट काँक्रीट ने चांगल्या पद्धतीने बुजवून रस्ता वाहतुकीयोग्य करावा अशी मागणी वाहनधारक तसेच स्थानिक ग्रामस्थांमधून होत आहे.