खेड (प्रतिनिधी) येथील काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत बंडाळी आणि पक्षातीलच पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये चाललेल्या शह-काटशह राजकारणामुळे तालुकाध्यक्षपदी असलेल्या गौस खतीब यांच्याकडे असलेली जबाबदारी काढून घेऊन पक्षश्रेष्ठींनी अजीम रहेमान सुर्वे यांच्याकडे तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी दिली. मात्र, त्यांच्यावर लोकसभा निवडणुकीमध्ये पक्षविरोधी काम केल्याबाबतची तक्रार प्रदेश कार्यालयाकडे प्राप्त झाल्यानंतर प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे संघटन व प्रशासन विभागाचे उपाध्यक्ष नाना गावंडे यांनी अजीम रहेमान सुर्वे यांच्याकडील तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी पुनश्च गौस खतीब यांच्याकडेच सोपविली आहे.
तसे पत्र जावक क्रमांक ५५६/२०२४, ७ ऑगस्ट २०२४ प्रमाणे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे पत्र तालुकाध्यक्ष गौस खतीब व रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांना देण्यात आले आहे. गौस खतीब हे पूर्वीपासून काँग्रेस पक्षाचे काम करीत आहेत. त्यांनी जिल्ह्यात व तालुक्यात उत्तमरित्या काम केलेले आहे. काँग्रेस पक्षासाठी अनेक गुन्हे त्यांनी स्वतःच्या अंगावर घेतले आहेत. अनेक आंदोलने केली आहेत. पक्षासाठी त्यांनी वेळोवेळी आक्रमकता दाखविली आहे. हेच प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निदर्शनास आल्याने गौस खतीब यांच्याकडेच पुनश्च खेड तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी सन्मानाने देण्यात आल्याचे येथील काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते सांगत आहेत.










