खळबळजनक ! दापोलीच्या कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्याचे ‘रॅगिंग’

 

 

चतृर्थ वर्षात शिकणाऱ्या तिघांनी सहकारी विद्यार्थ्याचा केला शारीरिक मानसिक छळ
महाविद्यालयाच्या माणगाव क्षेत्राभेटी दरम्यान घडला प्रकार
चौकशीसाठी महाविद्यालयाकडून समिती स्थापन

रत्नागिरी | प्रतिनिधी : दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कृषी महाविद्यालय दापोली येथे चतुर्थ वर्षात शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थ्याचा त्याच्याच वर्गातील ३ विद्यार्थ्यांनी शारिरिक व मानसिक छळ करून रॅगिंग केल्याची तक्रार या विद्यार्थ्याने या महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता यांचेकडे केली आहे.
कृषी महाविद्यालय दापोलीच्या चतुर्थ वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना कृषी शिक्षणाचे प्रत्यक्ष शिक्षण शेतात घेता यावे यासाठी त्यांना साडेचार महिने कृषी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील गावांमधील  शेतकरी यांचेकडे पाठविले जाते. विविध गावात राहून हे विद्यार्थी शेतीचे धडे घेत असतात. तसेच शेतकऱ्यांना विद्यापीठाने केलेल्या संशोधनाची माहिती देत असतात.
असाच ११ विद्यार्थी यांचा एक गट  रायगड जिल्ह्यातील  माणगाव तालुक्यातील एका गावात कार्यरत होता. त्यातील एका विद्यार्थाला याच गटातील अन्य ३ सहकारी विद्यार्थी त्रास देत होते. मात्र या विद्यार्थ्याच्या वडिलांना हृदयविकाराचा त्रास होत असल्याने त्याने या त्रासाबाबत आपल्या वडिलांना माहिती दिली नाही. त्याच्या या ३ सहकारी मित्रांनी या गावात प्रशिक्षण घेण्यासाठी गेल्यावर तिसऱ्या दिवसापासून या मुलाला शारीरिक व मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. यामध्ये अन्य सहकारी मित्र यांचेसमोर अंतर्वस्त्रावर नाचायला लावून त्याचा व्हिडीओ तयार करणे,  रात्री उंट होण्यास सांगून चादर अंगावर टाकून मारहाण करणे, दारू पाजून गुप्तांगाला दोरी बांधून त्रास देऊ अशीही धमकी देण्यात आल्याचे या विद्यार्थ्याने कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता यांच्याकडे केलेल्या लेखी तक्रारीत म्हटले आहे.
या तक्रारीची चौकशी करण्यासाठी कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. मकरंद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली होती. यात सदस्य म्हणून डॉ. आनंद मयेकर ( रावे कार्यक्रम प्रमुख), डॉ. जीवन आरेकर( कार्यक्रम अधिकारी), आर.एस. गुजर ( सहाय्यक कुलसचिव) यांचा समावेश आहे. या समितीने सर्व ११ विद्यार्थी यांचेकडून माहिती घेतली व मिळालेल्या प्राथमिक माहितीच्या आधारे या विद्यार्थ्याला त्रास देणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी दोघांना रत्नागिरी जिल्ह्यातील एका तालुक्यात तर अन्य एकाला रायगड मध्ये दुसऱ्या केंद्रावर पाठवण्यात आले असल्याची माहिती कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. मकरंद जोशी यांनी दिली. या प्रकरणी सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचेही डॉ. जोशी यांनी सांगितले. पहिल्या समितीने रॅगिंगसंदर्भात अहवाल दिल्यास दुसऱ्या समितीची स्थापना करण्यात येणार असून त्यामध्ये महाविद्यालयीन प्राध्यापकांसह पोलीस अधिकारी, स्वयंसेवी संस्थेचा प्रतिनिधी, तहसीलदार यांचाही समावेश असणार आहे. त्यामध्ये रॅगिंग झाल्याचे अंतिमत: निश्चित झाल्यानंतर रॅगिंगप्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई केली जाईल असेही त्यांनी सांगितले.
तक्रारदार विद्यार्थ्याने दापोली पोलीस स्थानकात १ ऑगस्ट रोजी तक्रार दिली असून या संदर्भात पोलिसांशीही संपर्क करणार असल्याचे डॉ. जोशी यांनी ‘प्रहार’ शी बोलताना सांगितले. चौकशी सुरु असून त्यात असा प्रकार निष्पन्न झाला तर आम्ही तसा अहवाल विद्यापीठाचे शिक्षण संचालक यांच्याकडे पाठवू. त्यावर ते निर्णय घेतील असे डॉ. जोशी यांनी सांगितले.