सूडबुद्धीने तक्रार केली हा मंडळ अधिकाऱ्यांचा कांगावा बिनबुडाचा

तहसीलदारांनी तंबी देऊनही कारभारात सुधारणार नाही- जितेंद्र चव्हाण

लांजा (प्रतिनिधी) सूडबुद्धीने आपली प्रांताधिकारी आणि तहसिलदार यांचेकडे तक्रार केल्याचा कांगावा करणारे साटवलीचे मंडळ अधिकारी के.व्ही. गायकवाड यांचा हा कांगावा बिनबुडाचा असून आधी तहसीलदारांनी दिलेल्या तंबीप्रमाणे प्रत्यक्ष कामकाजात सुधारणा करा आणि मगच बोला असे रोखठोक उत्तर साटवली येथील सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र चव्हाण यांनी दिले आहे .

साटवली मंडळाचे मंडळ अधिकारी के.व्ही. गायकवाड हे कार्यालयात गैरहजर राहत असल्याने ग्रामस्थांची गैरसोय होत होती. या विरोधात साटवली येथील जागरूक ग्रामस्थ जितेंद्र चव्हाण यांनी प्रांताधिकारी तसेच लांजा तहसीलदार यांच्याकडे तक्रार केली होती. मंडळ अधिकारी हे कार्यालयात हजर रहात नसल्याने पंचक्रोशीतील गावातील गोरगरीब जनतेची मोठी गैरसोय होत होती.

या तक्रारीत तथ्य असल्याने तहसीलदार लांजा यांनी मंडळ अधिकारी गायकवाड यांना सक्त सूचना दिल्या होत्या. तसेच दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आदेश दिले होते . असे असताना मंडळ अधिकारी गायकवाड यांनी एका डिजिटल मीडियाला खोटी माहिती देऊन आपल्यावर बिनबुडाचे आरोप केल्याचे सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र चव्हाण यांनी सांगितले .
साटवली मंडल अधिकारी गायकवाड हे कार्यालयात उपस्थित राहत नसल्याने त्यांना तहसीलदारांनी सूचना देऊन कार्यालयात उपस्थित राहण्याच्या आदेश ९ ऑगस्ट २०२४ रोजी दिले होते. तसेच तहसीलदार प्रमोद कदम यांनी गायकवाड यांना सक्त ताकीद देऊन एक महिना उलटून गेला तरी ते तहसिलदार यांच्या सूचनेप्रमाणे कार्यालयात उपस्थित राहत नाहीत याबाबत जितेंद्र चव्हाण यांनी खेच व्यक्त केला .
तहसीलदारांनी दिलेल्या सूचनांचे पालन न करता साटवलीचे मंडल अधिकारी कुलदीप गायकवाड यांनी एका डिजिटल मीडियाला आपल्यावरील कारवाईचा खुलासा करताना तक्रारदार यांचे बेकायदेशीर कामकाज केले नसल्याने आपली तक्रार केली असे म्हटले आहे. आपल्यावर बेकायदेशीर कामकाज करण्यासाठी ते दबाव टाकत होते वगैरे प्रकारच्या वल्गना गायकवाड यांनी केल्या आहेत. मात्र हे पूर्णपणे चुकीचे आहे. त्यामुळे आरोप करण्यापेक्षा मंडळाधिकारी यांनी कोणत्या कामकाजासाठी आपणास दबाव टाकला हे स्पष्ट करावे. आपण कोणते बेकायदेशीर कामकाज करण्यासाठी गेलो होतो ? याचा देखील त्यांनी खुलासा करावा. केवळ उगाचच डिजिटल मीडियाला निखालास खोटी आणि बिनबुडाची माहिती देऊ नये असे जितेंद्र चव्हाण यांनी म्हटले आहे.
माझ्या तक्रारीमध्ये तथ्य असल्यानेच लांजा तहसीलदार यांनी तुमची चौकशी करून तुम्हाला सक्त सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे यापुढे बिनबुडाचे आरोप करण्यापेक्षा आपल्या कामकाजात सुधारणा करा आणि जनतेला न्याय द्यायचा प्रयत्न करा, असे रोखठोक आव्हान जितेंद्र चव्हाण यांनी दिले आहे.