तहसिलदारांच्या विरोधात १५ ऑगस्ट रोजी आणखी एक उपोषण
हुकुमनाम्याची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप
वडवलीतील बळीराम चव्हाण करणार आमरण उपोषण
राजापूर (वार्ताहर): मौजे वडवली गावातील जमिन मिळकतीच्या वाटपपत्राबाबत न्यायालयाने दिलेल्या हुकुमनाम्याची अंमलबजावणी करणेसाठी गेल्या दोन वर्षांपासून राजापूर तहसिलदारांकडून टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे राजापूर तहसिलदारांविरोधात १५ ऑगस्ट २०२४ या स्वातंत्र्यदिनी तहसिलदार कार्यालयासमोर आपण आमरण उपोषण छेडत असल्याचे निवेदन वडवली तेलीवाडी येथील ग्रामस्थ बळीराम तुकाराम चव्हाण यांनी उपविभागीय अधिकारी राजापूर यांना दिले आहे.
मौजे वडवली येथील रहिवासी असलेल्या बळीराम चव्हाण आणि कुटुंबियांच्या वतीने सामाईक जमिन मिळकतीच्या वाटपपत्राबाबत दिपक काशिराम चव्हाण यांनी राजापूर येथील दिवाणी न्यायालयात १ जुलै २०२२ रोजी रे. दि. मु, नं. ५४/२०२२ ने दावा दाखल केला होता. त्यावर वादी व प्रतिवादीमध्ये तडजोड होवून ती तडजोड दि. १९ सप्टेंबर २०२२ रोजी राजापूर दिवाणी न्यायालयात सादर केली. व ती तडजोड पुरशीस मे. न्यायालयाने स्विकारली. व त्यावर योग्य ते आदेश करून मे. न्यायालयाने हुकुमनामा तयार करण्याचे आदेश पारीत केला व त्यानुसार न्यायालयाने आमचेतील तडजोडीचा हुकुमनामा तयार केला. मात्र मागील दोन वर्षात या हुकुमनाम्याची अंमलबजावणी झालेली नाही. कार्यवाहीबाबत विचारणा केली असता संबधीताकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत.
सबब सदर हुकुमनाम्याची अंमलबजावणी होवून न्यायालयाचे निर्देशाप्रमाणे कार्यवाही व्हावी अशी मागणी आहे. मात्र याबाबत तहसिलदार राजापूर कार्यालयाकडून उचीत कार्यवाही करण्यास टाळाटाळ केली जात असल्याने आमच्या संयम व सहनशीलतेचा अंत झाला असून आमरण उपोषणाशिवाय पर्याय उरला नसल्याचे श्री. चव्हाण यांनी या निवेदनात नमुद केले आहे.
महसुल प्रशासनाच्या अशा दिरंगाई कार्यवाहीला कंटाळून अर्जदार दिपक काशिराम चव्हाण हा आमचा चुलत भाऊ बेपत्ता झाला आहे. या प्रकरणी उचीत कार्यवाही न होता आम्हाला उपोषण करावे लागल्यास व त्यातून जीवीतहानी झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी ही महसुल प्रशासनाची राहील असा ईशाराही श्री. चव्हाण यांनी दिला आहे.










