…तर किमान नगरसेवक तरी होऊन दाखवा, सुशांत नाईकना संतोष किंजवडेकर यांचा टोला

उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी आमदार नीतेश राणे यांच्यावर टीका करण्यापेक्षा कणकवली नगरपंचायतीची आगामी निवडणूक लढवून नगरसेवक तरी होऊन दाखवावे. युवक काँग्रेस जिल्हाध्यक्षांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यापूर्वी किंजवडे गावातील नादुरुस्त झालेल्या साकवाचा प्रश्न उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना महाविकास आघाडी शासनाच्या काळात का सुटला नाही? सुशांत नाईक यांचे भाऊ आमदार वैभव नाईक यांनी किंजवडे गावातील साकवाचा प्रश्न का मार्गी लावला नाही? असा सवाल भाजपचे जिल्हा चिटणीस संतोष किंजवडेकर यांनी जामसंडे येथील भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेतून उपस्थित केला.

श्री. किंजवडेकर म्हणाले, माजी आमदार कै. आप्पासाहेब गोगटे यांच्या आमदारकीच्या कार्यकाळात १९९७ साली किंजवडे बाईतवाडी येथे अन्नपूर्णा नदीवर साकव बांधण्यात आला होता. या साकवाची दुरुस्ती २०१६ साली करण्यात आली होती. मात्र, सध्या हा साकव नादुरुस्त बनला असून धोकादायक स्थितीत आहे. त्या साकवाच्या ठिकाणी मायनर ब्रीज बांधण्यात यावा, अशी आपली मागणी असून यासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे, आमदार नीतेश राणे यांच्या माध्यमातून आपला पाठपुरावा सुरू आहे. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी नुकत्याच घेतलेल्या जनता दरबारामध्येही किंजवडे साकवाचा प्रश्न आपण मांडला असून पालकमंत्री चव्हाण यांनी प्राधान्याने हा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन आपल्याला दिले आहे. या मायनर ब्रीजसाठी सुमारे ५ कोटी २५ लाखाचा निधी आवश्यक आहे. न्यायासाठी दाद मागणे हा प्रत्येकाचा हक्क आहे. परंतु, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर या साकवाप्रश्नी राजकारण करून गावाची बदनामी करीत आहेत. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना ४९ हजाराचे लीड कणकवली विधानसभा मतदार संघातून मिळाले होते. माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार नीतेश राणे यांनी केलेल्या विकासकामांची दखल घेऊन येथील जनतेने त्यांना भरघोस मतांनी विजयी केले. ही त्यांच्या कामाची, विश्वसाची पोचपावती आहे. राणेंच्या माध्यमातून झालेल्या विकासकामांचा पोटसूळ युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांना असल्याने ते राणेंवर टीका करीत आहेत. त्यांनी विधानसभेची स्वप्ने न पाहता आगामी कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीत नगरसेवकपदी तरी विजय मिळवून दाखवावा. नंतरच त्यांनी आमदार नीतेश राणे यांच्यासारखे ढाण्या वाघासमोर उभे राहावे, असा टोलाही किंजवडेकर यांनी लगावला.