संजू परब यांचा वाढदिवस जल्लोषात होणार साजरा

भाजपा, सह्याद्री फाउंडेशन व संजू परब मित्र मंडळाचे आयोजन

सावंतवाडी । प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा सावंतवाडी शहराचे माजी नगराध्यक्ष सच्चिदानंद उर्फ संजू परब यांचा वाढदिवस सोमवार १९ ऑगस्ट रोजी नगरपरिषदेच्या बॅरिस्टर नाथ पै सभागृहात सकाळी ११ वाजता जल्लोषात साजरा करण्यात येणार आहे. या वाढदिवस सोहळ्याला भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस माजी खासदार निलेश राणे उपस्थित राहणार आहेत.

भारतीय जनता पार्टी, सह्याद्री फाउंडेशन व संजू परब मित्र मंडळ यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम साजरा करण्यात येणार असून वाढदिवसाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे.

संजू परब यांच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर सह्याद्री फाउंडेशनतर्फे गेले काही दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून देखील संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवार १९ ऑगस्ट रोजी सकाळी सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप, गोरगरिबांना धान्य वाटप अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी भाजपच्या सर्व सेलचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

सह्याद्री फाउंडेशनच्या माध्यमातून १९ ऑगस्ट रोजी ग्रंथतुला होणार असून ६७ किलोंचे ग्रंथ साहित्य यावेळी विविध वाचनालयांना वितरित करण्यात येणार आहे. तर सायंकाळी सहा वाजता येथील बॅरिस्टर नाथ पै सभागृहात श्री अमृतनाथ दशावतार नाट्य मंडळ म्हापण यांचा ‘कुर्मदासाची वारी’ हा सुप्रसिद्ध नाट्यप्रयोग आयोजित करण्यात आला आहे. वाढदिवस सोहळ्याबरोबरच या सर्व कार्यक्रमांना देखील भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच संजू परब यांचे आप्तस्वकीय, मित्रमंडळी, हितचिंतक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.