मंगळवारी सकाळपासून पुन्हा शोधमोहीम राबविणार
सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडीतील मोती तलावात सोमवारी शहरातील एका युवकाने उडी घेतली. न्यायालय परिसरात घडलेला हा प्रकार तेथे उपस्थित असलेल्या काही स्थानिकांनी पाहिला. घटनास्थळी उभी असलेली दुचाकी व मोती तलावाच्या काठावर असलेले चप्पल यामुळे सदरचा युवक हा शहरातील एक व्यापारी असून तो एका राजकीय पक्षाचा पदाधिकारीही असल्याचे समजते. दरम्यान, नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या शोध मोहिमेत या युवकाचा मृतदेह दुपारी उशिरापर्यंत न सापडल्याने स्कुबा डायव्हिंग पथकाला पाचारण करण्यात आले मात्र त्यांनाही यश न मिळाल्याने रात्री आठच्या सुमारास ही मोहीम स्थगित करण्यात आली. तर मंगळवारी पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात येणार आहे, असे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी सांगितले.

सावंतवाडी न्यायालय परिसराच्या आवारात सोमवारी सकाळी शहरातील एका युवकाने मोठी तलावात उडी घेतल्याची दुर्दैवी घटना घडली.सकाळी नऊच्या सुमारास त्या ठिकाणी सफाई कामगाराला कॅन्टीन चालू आहे का असे त्याने विचारले व त्या ठिकाणी गाडी लावून त्याने तलावात उडी घेतली. या घटनेनंतर संबंधित सफाई कामगाराने याबाबतची माहिती लगतच असलेल्या टेम्पो चालकांना व इतर नागरिकांना दिली. त्यानंतर सावंतवाडी नगरपालिका पालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र त्यात यश आले नाही. दरम्यान, तलावात उडी घेण्यापूर्वी त्या युवकाने शहरात आपल्या काही मित्रांबरोबर चर्चा केली. उभा बाजार चितारआळी येथील एका मित्राला त्याने तुम्ही सर्व गुण्यागोविंदाने रहा आपापसात भांडू नका मी आता नाही आहे असे सांगितले. मात्र तो गंमत करत असेल असे समजून त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले, अशी माहिती त्या ठिकाणी उपस्थित काही नागरिकांनी दिली.
श्रावण सोमवार असल्याने दुकानातून पान विडा खरेदी करत पाटेकर देवस्थान मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेतले. तेथून न्यायालय परिसरात येत तिथे सफाई करणाऱ्या कामगारांना कॅटिन चालू आहे का अशी विचारणा केली त्यावेळी कामगारांनी ते बंद असल्याचे सांगितले. यानंतर त्या युवकाने आपली दुचाकी न्यायालयाच्या परिसरात पार्किंग ठिकाणी पार्क करत तलावात उडी घेतली. ही बाब सफाई कामगारांना समजताच त्यांनी लगतच्या नागरिकांना हाक देत मदतीसाठी आवाहन केले. त्यातील काही जणानी दोरी घेत तलावाच्या दिशेने धाव घेतली व दोरी टाकली असता पाण्यात दोन वेळा बुडून वर येणारा तो युवक थेट पाण्यात खोलवर गेला त्यामुळे त्याला वाचवण्याचे प्रयत्न निष्फळ ठरले.
दरम्यान याबाबतची माहिती मिळताच युवकाचा एक मित्र त्या ठिकाणी आला त्याने दुचाकी ओळखली. तातडीने त्याने पोलिसांना फोन करून याबाबतची माहिती दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी नगरपालिका प्रशासनाला या घटनेची माहिती देत नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांद्वारे शोधमोहीम राबविण्यासाठी आवाहन केले. त्यानंतर नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी होडीच्या सहाय्याने शोध घेतला परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. तलावात युवकाने आत्महत्या केल्याची माहिती मिळताच नागरिकांनी मोठी गर्दी केली.
अखेर सांगली येथील बाबल आल्मेडा रेसक्यू टीमला पाचारण करण्यात आले त्यानी तीन तास तलावात पाण्यात खोलवर जाऊन मृतदेहाचा शोध घेतला मात्र तो सापडला नाही. दुपार पर्यंत शोध कार्य सुरूच होते. मोती तलावात खोलवर गाळ असल्याने मृतदेह त्या गाळात रुतला असावा अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे दुपारनंतर अखेर शोध मोहीम राबविण्यासाठी शिरोडा येथून स्कुबा डायव्हिंग पथक मागविण्यात आले ते तातडीने सावंतवाडीत दाखल झाले. डायव्हरनी सिलेंडरच्या मदतीने खोलवर जाऊन मृतदेह शोधण्याचा प्रयत्न केला. खाली गाळ व चिखल असल्याने स्पष्ट दिसण्यास अडचण निर्माण होत होती. त्यांनी सायकाळी साडे सहा वाजेपर्यंत पाण्यात खोलवर शोध घेतला तरीही मृतदेहाचा थांगपत्ता लागला नाही.
दिवसभरात शोध मोहिमे वेळी न्यायालय व तलाव परिसरात नागरिकांची गर्दी वाढतच होती. बारा तासानंतर मृतदेह फुगून बाहेर येईल अशी शक्यता होती मात्र तसे झाले नाही. घटनास्थळी प्रांताधिकारी हेमंत निकम, नायब तहसीलदार मनोज मुसळे, पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी भेट दिली. यावेळी होडीच्या सहाय्याने मृतदेहचा शोध उशिरा पर्यंत सुरुच होता. अखेरीस उशीर झाल्यामुळे रात्री ७ च्या सुमारास ही शोध मोहीम थांबविण्यात आली. घटनास्थळी पोलीस व नागरिक मृतदेहचा शोध घेत थांबले होते.












