कोकणातील भूमिपुत्रांच्या प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी भु गावातून गुरूवारी २२ ऑगस्ट पासून आंदोलनाची सुरुवात-संजय यादवराव

 

राजापूर | प्रतिनिधी : कोकणातील शेतकरी, बागायतदार, मच्छीमार, पर्यटन विकास या न्याय हक्कासाठी व मागण्यांसाठी शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी राजापूर तालुक्यातील भू गावातून ऐतिहासिक अशा आंदोलनाची सुरुवात करत असल्याची माहिती स्वराज्य भूमी आंदोलन व समृद्ध कोकण संघटना अध्यक्ष संजय यादवराव यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली .

गुरुवार दिनांक 22 ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता हे साखळी उपोषण आंदोलन सुरू होणार असून भू खींणगिणी येथे होणाऱ्या या आंदोलनात आपल्या मूलभूत हक्कांसाठी कोकणातील हजारो शेतकरी, मच्छिमार, व्यावसायिक रस्त्यावर उतरून आपल्यावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात शांततापूर्ण मार्गाने निषेध व्यक्त करणार असल्याचे यादवराव यांनी सांगितले. त्यानंतर 25 ऑगस्ट पासून रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण छेडण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमुद केले.

गेली दहा वर्षे कोकणातील आंबा बागातदार अडचणीत आहेत. तीन चक्रीवादळे दोन वर्ष सीझनमध्ये कोरोना आणि ग्लोबल वॉर्मिंगचे परिणाम यामुळे कोकणातील आंबा बागायतदार उध्वस्त झाले आहेत कर्ज फेडू शकत नाही अशी स्थिती आहे, सरकारे बदलली तरी पण कोकणातल्या आंबा बागेतदारांची स्थिती तशीच आहे. गेल्या पंधरा-वीस वर्षात कोकणामध्ये माकडांची संख्या प्रचंड वाढली, ही माकडे शेती करूच देत नाहीत पण आता घरात शिरून घरातल्या वस्तू सुद्धा न्यायला लागली, गेली चार-पाच वर्षे या माकडांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा त्यांचे निर्बीजीकरण करावे आणि त्यांना सह्याद्रीच्या जंगलामध्ये सोडून द्यावे अशी मागणी शेतकरी करत असताना वन विभागाकडून कोणतीही उपाययोजना नाही.

उर्वरित महाराष्ट्रात ऊस ,साखर ,कापूस, सोयाबीन , धान यांना हमीभाव मिळावेत म्हणून सरकारी तिजोरीतून हजारो कोटी रुपये दरवर्षी खर्च होतात पण कोकणातील काजू बी, सुपारी ,भात कोणत्याच पिकाला हमीभाव मिळत नाही किंबहुना ही सगळी पिके दुर्लक्षित आहेत, या सर्व विषयात कोकणातील शेतकरी अस्वस्थ आहेत आणि म्हणून बेमुदत आंदोलन करण्याचा निर्णय कोकणातील शेतकऱ्यांनी घेतला आहे.

कोकणात मच्छीमारांची स्थिती बिकट आहे, अनीर्बंद पद्धतीने मासेमारी करणे यामुळे किनाऱ्यावरच्या पारंपारिक मच्छीमारांना मासे मिळत नाहीत अशी गेली दहा-पंधरा वर्षे स्थिती आहे, कोकणातील सुमारे पाच लाख मच्छीमार उध्वस्त होतील अशा स्थितीत सुद्धा महाराष्ट्र शासनाकडून विशेषता मस्य विभागाकडून या मच्छीमारांना कोणतीच शाश्वत मदत मिळत नाही म्हणून या स्थितीत संपूर्ण कोकणातील मच्छीमारांनी आंदोलन करायचे ठरवले आहे.

कोकणातील तिसरा महत्त्वाचा विषय पर्यटन, कोकणातील एकही तरुणाला पर्यटन प्रकल्प उभारण्यासाठी कसलीच मदत केली जात नाही सरकारी योजना राबवल्या जात नाही, सबसिडी नाही या पलीकडे जाऊन साध्या परवानग्या दिल्या जात नाहीत, मदत सोडा पण दरवर्षी या पर्यटन व्यावसायिकांना जाणीवपूर्वक प्रशासकीय यंत्रणांकडून त्रास दिला जातो नोटीसा दिल्या जातात, कोकणात पर्यटन प्रकल्पांना जिल्हास्तरावर परवानगी मिळाव्यात यापुढे आम्ही परवानगी घेण्यासाठी चेन्नईला जाणार नाही, कमी व्याजदराने कर्ज मिळाली पाहिजेत सबसिडी मिळाल्या पाहिजेत आणि सर्वात महत्त्वाचे 2024 पर्यंत स्थानिक तरुणांनी उद्योजकांनी शेतकऱ्यांनी बांधलेली सगळी पर्यटनाची बांधकामे नियमित करण्यात यावीत अशा मागण्या पर्यटन व्यवसायिकांकडून करण्यात येत आहेत.

यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. भू या गावातून आणि पंचक्रोशीतून सर्व सामान्य शेतकऱ्यांकडून या आंदोलनाची सुरुवात होत आहे. त्यानंतर रत्नागिरी, दापोली, श्रीवर्धन, पालघर अलिबाग, सिंधुदुर्ग सर्वत्र शेतकरी रस्त्यावर उतरणार आहेत. आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत हे बेमुदत आंदोलन चालू रहाणार असल्याचे यादवराव यांनी सांगितले. याप्रसंगी संजय सरफरे, बाबा सरफरे व शेतकरी उपस्थित होते.