भाजपचे युवा नेते संदीप गावडे यांची घोषणा
शैक्षणिक क्षेत्रात मुलांच्या बुद्धिमत्तेला वाव देण्यासाठी प्रयत्न
सावंतवाडी । प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्हा हा गुणवंतांची खाण आहे. आपल्या विद्यार्थ्यांची १० व बारावीतील टक्केवारी सर्वाधिक असते. तर बहुतांश शाळांचा निकाल हा १०० टक्के लागतो. मात्र, असे असताना एमपीएससी, यूपीएससी, बँकिंग व तत्सम स्पर्धा परीक्षांमध्ये गुणवत्ता असूनही आपल्या मुले मागे पडताना दिसतात. योग्य मार्गदर्शन व भौतिक सुविधा नसल्यानेच हे घडते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी बालवयातच स्पर्धा परीक्षांची कास धरावी, त्यांची स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अभ्यासाची मानसिकता तयार व्हावी याच उद्देशाने ‘संदीप गावडे फाऊंडेशन ‘ च्या माध्यमातून या वर्षापासून इयत्ता चौथीसाठी ‘यशवंत शिष्यवृत्ती स्पर्धा’ परीक्षा आयोजित केली जाणार आहे, अशी माहिती फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संदीप गावडे यांनी सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
भाजपचे युवा नेते संदीप गावडे यांच्या संकल्पनेतून त्यांचे दिवंगत बंधु यशवंत गावडे यांच्या स्मरणार्थ यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता चौथीसाठी ‘यशवंत शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा’ आयोजित करण्यात येत आहे. शैक्षणिक क्षेत्रात मुलांच्या बुद्धिमत्तेला वाव देण्यासाठी आमचा प्रयत्न असून यंदाच्या शैक्षणिक वर्षात इयत्ता चौथीसाठी ही स्पर्धा परीक्षा प्रथमतः सावंतवाडी, वेंगुर्ला आणि दोडामार्ग या तीन तालुक्यांसाठी घेण्यात येणार आहे. या तीनही तालुक्यातील इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकास वाढीसाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे, असेही संदीप गावडे यांनी सांगितले. तर पुढील टप्प्यात इयत्ता पाचवी, सहावी, सातवी ते इयत्ता बारावीपर्यंत ही स्पर्धा घेण्याचा मानस असून आगामी काळात संपूर्ण जिल्हाभर याची व्याप्ती वाढणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. या शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना केवळ पुरस्कार व बक्षीस न देता त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी संदीप गावडे फाउंडेशनच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य केले जाणार आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
तसेच या परीक्षेचा उद्देश हा केवळ एका वर्षासाठी मर्यादित नसून गुणवत्ताधारक विद्यार्थ्याला प्रत्येक वर्षी प्रोत्साहित केले जाणार आहे. आगामी काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी तयार करणे हा या परीक्षेचा प्रमुख उद्देश आहे, असे फाऊंडेशनचे सचिव व प्राथमिक शिक्षक दत्ताराम सावंत यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी हा प्रयत्न असून या वर्षी २०० गुणांची एकमेव प्रश्नपत्रिका असणार आहे. त्याचा सिलॅबस तयार करण्यात आला असून त्याची पुस्तके देखील सर्व शाळांना वितरित करण्यात येणार आहेत, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
यावेळी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संदीप गावडे, विद्यमान अध्यक्ष सुधीर गावडे, उपाध्यक्ष रोशन राऊत, सचिव दत्ताराम सावंत, कार्यकारिणी सदस्य सतीश राऊळ, प्रवीण शेर्लेकर, महेश सावंत, समीर जाधव, भास्कर गावडे, तेजस्विता वेंगुर्लेकर, राधिका परब, स्वाती पाटील, रुपेश परब, जे. डी. पाटील, सुरेंद्र विर्नोडकर, कृष्णा गावडे आदी उपस्थित होते.












