नाटे बाजारपेठेत मोबाईल शॉपी चोरट्याने फोडली..

 

गेल्या काही दिवसांत चोऱ्यांचे प्रमाण वाढले

पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह???

जैतापूर (वार्ताहर): मंगळवारी रात्री नाटे सडापेठ बाजारपेठेतील एसटी स्टँड नजीकच्या काझी यांच्या जैद मोबाईल शॉपी वर चोरट्यांनी डल्ला मारला असून लाखो रुपयांचे मोबाईल आणि अन्य साहित्य चोरून नेल्याची भीती व्यक्त होत आहे.

गेल्या काही दिवसात नाटे भागात मोठ्या प्रमाणावर चोरांनी उच्छाद मांडल्याची चर्चा सुरू असून पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

चार-पाच दिवसांपूर्वीच एका मच्छी व्यावसायिकाच्या जाळ्याला लावलेली लाखो रुपये किमतीची शिसे चोरून नेल्याची चर्चाही सुरू आहे.श्रमिक पतपेढी वरील धाडसी दरोड्याचा तपास अद्याप लागलेला नाही. आता भर बाजारपेठेतील मोबाईल शॉपी फोडण्यात आली असून यापूर्वी देखील याच शॉपी मध्ये चोरी झाल्याची घटना घडली होती. आश्चर्य म्हणजे हाकेच्या अंतरावर सागरी पोलीस ठाणे असून नाटे व्यापारी मंडळांने संपूर्ण बाजारपेठेत सीसीटीव्ही ही लावल्याची चर्चा सुरू आहे. मात्र हे असताना देखील चोऱ्या वाढत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

मोबाईल शॉपी फोडल्याचे लक्षात येतात पोलिसांना कळविण्यात आले आहे पोलीस घटनास्थळी पोहोचले असून आता कोणत्या पद्धतीने या चोरीचा तपास होतो आणि चोर सापडतो का याच्याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे. चोरीच्या घटनांमध्ये वारंवार वाढ होत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे.