वक्तव्याचा निषेध : माफी मागण्याचीही मागणी
सावंतवाडी । प्रतिनिधी : रामदास कदम यांचे आता वय झाले आहे. ते केवळ आपल्या मतदारसंघापूरते नेते राहिले आहेत. लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात देखील ते महायुतीच्या उमेदवाराला मताधिक्य देऊ शकले नाहीत. त्यामुळे रवींद्र चव्हाण यांच्यावर बोलण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही. त्यांच्या वक्तव्यामुळे महायुतीमध्ये दरी निर्माण होत असल्याने त्यांना आवरण्याची मागणी आम्ही
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार आहोत.
तर रामदास कदम यांनी युती बिघडवण्याचे काम केले आहे त्यामुळे जोपर्यंत रामदास कदम हे रवींद्र चव्हाण यांची जाहीर माफी मागत नाहीत तोपर्यंत महायुती म्हणून भाजपकडून कोणतीही मदत केली जाणार नाही, असा इशारा भाजपचे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ प्रमुख राजन तेली यांनी दिला. यावेळी त्यांनी रामदास कदम यांच्या त्या वक्तव्याचा जाहीर निषेधही केला. सावंतवाडी येथील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अजय सावंत उपस्थित होते.
माजी केंद्रीय मंत्री खा. नारायण राणे हे कोकणचे नेते आहेतच. लोकसभा निवडणुकीत त्यांच्यावर महाराष्ट्राची जबाबदारी होती. तर रविंद्र चव्हाण यांच्यावर कोकणची जबाबदारी देण्यात आली होती. ती त्यांनी यशस्वीपणे पार पाडली. पक्ष संघटना बळकट करण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील राहिले आहेत. त्यात त्यांनी वेळोवेळी यशही प्राप्त केले आहे. तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत रामदास कदम यांच्याच मतदारसंघात महायुतीला ८ हजार ५०० मतांचा फटका बसला आहे. त्यामुळे जे स्वतःचा मतदारसंघ सांभाळू शकत नाहीत त्यांनी रवींद्र चव्हाण यांच्यावर बोलण्याची हिंमत करू नये, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
दरम्यान, दर्जेदार रस्त्यांसाठी जगात नाव घेतलं जाणाऱ्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील कोकणच्या हायवे समोर हात टेकले. त्यांनी स्वतः असे विधान केले आहे की देशात चांगले रस्ते घडवताना कोकणात अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला. मात्र, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी मंत्री म्हणून त्यासाठी वेळोवेळी प्रयत्न केले. ठेकेदार, न्यायालयीन प्रकरणांमुळे हे काम आजवर रखडले होते. मात्र, आता हा प्रश्न मार्गी लागत आहे. सिंधुदुर्गसारखं काम रत्नागिरी, रायगडमध्ये झालं असतं. तर ही अवस्था झाली नसती. त्यामुळे त्याचं खापर कुणा एकाच्या माथ्यावर फोडणं चुकीचं असून ही सामूहिक जबाबदारी आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
कोकणात भाजपची ताकद वाढत आहे. स्वतःची ताकद वाढविण्यासाठी प्रत्येक पक्ष कार्यरत असतो. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने देखील राज्यातील २८८ मतदारसंघातही तयारी केली आहे. सर्वच पक्ष त्या दृष्टीने प्रयत्न करीत असतात. मात्र, पार्लमेंटरी बोर्ड जो निर्णय घेईल तो सर्वांना मान्य असेल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.












